संजयनगरमधील खून अनैतिक संबंधातून : संशयित आतेभावाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:23 PM2018-02-28T23:23:31+5:302018-02-28T23:23:31+5:30

सांगली : संजयनगर येथील गुडलाईन फर्निचर दुकानात संजय शिवाजी जाधव (वय ३५, रा. फरीदखानवाडी, ता चिकोडी) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले.

Sanjaynagar murder: Immoral connection | संजयनगरमधील खून अनैतिक संबंधातून : संशयित आतेभावाला अटक

संजयनगरमधील खून अनैतिक संबंधातून : संशयित आतेभावाला अटक

Next
ठळक मुद्देअकरा तासांत खुनाचा उलगडा

सांगली : संजयनगर येथील गुडलाईन फर्निचर दुकानात संजय शिवाजी जाधव (वय ३५, रा. फरीदखानवाडी, ता चिकोडी) या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले. मृत जाधव याचे त्याच्याच नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधातून आतेभावाने त्याचा काटा काढल्याचे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी आतेभाऊ प्रकाश बाळासाहेब जगताप (वय २८, रा. पाटणे प्लॉट, संजयनगर) याला अटक केली आहे.

मृत संजय हा अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या तयार करण्याचे काम करीत होता. मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तो गुडलाईन फर्निचर दुकानात साहित्य खरेदीसाठी आला असता, त्याच्या डोळ्यात चटणीपूड टाकून कोयत्याने डोके, गळा, पोट, हात व पायावर वार करून खून करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविली. बुधवारी दुपारी मुख्य संशयित प्रकाश जगतापला कुपवाड एमआयडीसीतून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली.

याबाबत निरीक्षक भिंगारदेवे म्हणाले की, मृत संजय व संशयित प्रकाश दोघेही नातेवाईक आहेत. संजय याचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधाची चर्चा संजयनगर परिसरात होती. त्यातून परिसरातील मित्रमंडळी प्रकाशला चिडवत होती. त्यामुळे त्याचा संजयवर राग होता. मृत संजय हाही सूतगिरणी परिसरात रहात होता. पण दीड वर्षापूर्वी तो त्याच्या मूळ गावी फरीदखानवाडीत राहू लागला. त्याला तीन मुली आहेत, तर संजय याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून, वर्षभरापूर्वी त्याने दुसरा विवाह केला आहे. तो मूळचा दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथील आहे.

मंगळवारी प्रकाश हा सकाळी कामानिमित्त बाहेरगावी जाणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. त्याने सांगलीतील एका दुकानातून नवीन कोयता खरेदी केला. त्याने संजयवर पाळत ठेवली. सायंकाळी संजय फर्निचरच्या दुकानात साहित्य खरेदीसाठी आला होता. तेव्हा प्रकाशने रस्त्याच्या दुसºया बाजूला मोटारसायकल उभी केली. हातात कोयता घेऊन तो फर्निचरच्या दुकानात आला. संजयच्या डोळ्यात त्याने मिरची पूड टाकून तो कोयता घेऊन त्याच्या मागे धावला.

संजयने दुकानात धाव घेतली. प्रकाशच्या हातातील कोयता पाहून दुकानातील इतर कामगार बाहेर पळाले. त्यानंतर प्रकाशने संजयवर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. खुनानंतर तो शांतपणे दुकानातून बाहेर पडला. पण हातात कोयता पाहून त्याला अडविण्याचे धाडस कोणाचेच झाले नाही. तो एमआयडीसीत लपून बसल्याचे समजताच संजयनगर पोलीस ठाण्याकडील दिनेश माने, हरिबा चव्हाण, सचिन महाडिक, सूरज पाटील, सुनील कोकाटे, विशाल बिले यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास निरीक्षक भिंगारदेवे करीत आहेत.

आठ महिन्यांपूर्वी हल्ल्याचा प्रयत्न
मृत संजय याचे नात्यातील महिलेशी दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाला संशयित प्रकाशचा विरोध होता. यातून या दोघांत अनेकदा वाद झाले होते. संजयला अनेकवेळा समजावले होते. सात ते आठ महिन्यांपूर्वी मंगळवार बाजार परिसरात प्रकाशने संजयच्या डोळ्यात चटणीपूड टाकून कोयत्याने हल्लाही केला होता. पण या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही. नातेवाईकांनी दोघातील वाद मिटविला होता. या गुन्ह्याची त्याने बुधवारी कबुली दिली. तसेच मृत संजय याला भीती दाखविण्यासाठी हल्ला केल्याचेही सांगितले.
आज न्यायालयात हजर करणार

संशयित प्रकाश याने वापरलेला कोयता व अंगावरील कपडे लपवून ठेवले आहेत. त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे निरीक्षक भिंगारदेवे यांनी सांगितले.

Web Title: Sanjaynagar murder: Immoral connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.