कृषी संशोधन केंद्र ठरतेय शेतकऱ्यांसाठी संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:26 AM2021-03-27T04:26:56+5:302021-03-27T04:26:56+5:30
फोटो : सुरेंद्र दुपटे शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कमी पाण्यात, कमी खर्चात, शेतीचे जादा उत्पन्न मिळावे, ...
फोटो : सुरेंद्र दुपटे
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कमी पाण्यात, कमी खर्चात, शेतीचे जादा उत्पन्न मिळावे, या संकल्पनेतून कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्र काम करीत आहे. सोयाबीन, भुईमूग, हळद अशा विविध नगदी पिकांचे वाण या केंद्राने विकसित केले आहेत. सेंद्रीय शेतीचा प्रयोग असो अथवा क्षारपड जमिनीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून शेती व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी कृषी संशोधन केंद्रातील संशोधक प्रयत्नशील आहेत.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कसबे डिग्रज येथे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. सुरुवातीला हे केंद्र केवळ चाचणी केंद्र होते. तसेच शेतीशास्त्र महाविद्यालय होते. १९९८७ पासून या केंद्रातून शेती संशोधनाचे काम सुरू झाले. तसेच विद्यापीठस्तरावर होणारे संशोधन, नवीन वाण या जिल्ह्यातील वातावरणाशी कसे जुळते, याचे संशोधन सुरू झाले.
१९९० च्या दशकात जिल्ह्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला. संशोधन केंद्राने क्षारपड जमिनीची समस्या सोडविण्यासाठी संशोधन हाती घेतले. त्यातून सच्छिद्र निवारा प्रणाली, मोल्ड नांगर प्रणाली विकसित केली. १०० एकरवर या प्रणालीची चाचणी घेतली असता उसाचे १५ टन उत्पन्न वाढले. त्यानंतर शासन, साखर कारखान्यांनीही क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेतला. या काळात जिल्ह्यात सोयाबीनचे चांगले उत्पन्न होते. १९९२ नंतर सोयाबीनवर तांबेरा हा रोग आला. त्यामुळे सोयाबीन पीकच धोक्यात आले. त्यावर संशोधन केंद्राकडून २००४ मध्ये ‘फुले कल्याणी’ हा तांबेराप्रतिबंध वाण विकसित करण्यात आला. त्यानंतर ‘फुले अग्रणी, फुले संगत आणि फुले किमया’ या उत्पादन क्षमता वाढविणारी जात विकसित केली.
भुईमूग पिकाच्याही ‘फुले मोरणा, फुले वारणा व फुले चैतन्या’ या तीन जाती विकसित केल्या. हळदीतही ‘फुले स्वरुपा’ हे नवीन वाण आणले. त्यात हळदीचे क्रुकोमीन घटक वाढविण्यास मदत झाली. त्याशिवाय हळदीच्या कंदकुजीसह, हुमणी, मररोग व इतर रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी संशोधन झाले. याशिवाय हळद काढण्यासाठी व ती शिजविण्यासाठी मशिनरी विकसित केली आहे. रासायनिक खातांचे वेळापत्रक तयार करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. उसाचे नवीन २६५ ही जातही याच केंद्रात विकसित केली होती.
चौकट
बियाणे विक्री केंद्र सुरू
कृषी संशोधन केंद्रात राहुरी विद्यापीठांतर्गत विकसित केलेल्या पिकांच्या नवीन जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बियाणे विक्री केंद्र सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांचा समावेश असलेला शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केला आहे. या शेतकऱ्यांना विद्यापीठातील नवनवीन संशोधनाची माहिती दिली जाते. मोबाईल व्हॅनद्वारे गावपातळीपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याचे केंद्राचे प्रमुख डाॅ. दिलीप कठमाळे यांनी सांगितले.