संखचा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:37+5:302021-06-24T04:19:37+5:30
फोटो : २३०६२०२१ हणमंत म्हेत्रे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माती वाहतूक करणारे जप्त वाहन सोडण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी ...
फोटो : २३०६२०२१ हणमंत म्हेत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माती वाहतूक करणारे जप्त वाहन सोडण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी दोन लाख ३० हजारांच्या लाच प्रकरणातील पसार असलेला संखचा अप्पर तहसीलदार हणमंत रामचंद्र म्हेत्रे (वय ४६, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाला. मंगळवारी लाच स्वीकारताना माडग्याळचा तलाठी विशाल विष्णू उदगिरे (३७) याला रंगेहाथ पकडण्यात आले होते, तर म्हेत्रे पसार झाला होता. दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी म्हेत्रे याचे संखमधील निवासस्थान सील करण्यात आले, तर मणेराजुरी येथील घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार वाहनातून मातीची वाहतूक करीत होते. अप्पर तहसीलदार म्हेत्रे व तलाठी उदगिरे यांनी त्यांचे वाहन अडवून जप्त केले. कारवाई न करता हे वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराकडे अडीच लाखांची लाच मागितली होती. लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या पडताळणीत तथ्य आढळल्याने मंगळवारी संख तहसील कार्यालयात दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी उदगिरे याला रंगेहाथ पकडण्यात आले होते, तर म्हेत्रे पसार झाला होता. दोघांवरही उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी अप्पर तहसीलदार म्हेत्रे स्वत:हून सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाला. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
चौकट
घराची झडती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अप्पर तहसीलदार म्हेत्रे याच्या मणेराजुरी येथील घरावरही छापा टाकून झडती घेतली.