संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बोरगाव प्रथम, सांगली जिल्हा परिषदेकडून निकाल जाहीर
By अशोक डोंबाळे | Published: November 21, 2023 07:12 PM2023-11-21T19:12:09+5:302023-11-21T19:12:39+5:30
सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) प्रथम पटकविला आहे. सांडगेवाडी ...
सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) प्रथम पटकविला आहे. सांडगेवाडी (ता.पलूस) द्वितीय आणि बनेवाडी (ता.वाळवा) व बाणूरगड (ता.खानापूर) ग्रामपंचायतीला विभागून तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी मंगळवारी निकाल जाहीर केला आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा २०२२-२३ या वर्षी झाल्या आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद मतदार संघातील प्रथम आलेल्या ६० ग्रामपंचायतींपैकी गुणानुक्रमे पहिल्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत गावांची तपासणी झाली होती. या स्पर्धेतील लाहीलाही सहभागी गावांनी स्वच्छतेच्या माध्यमातून लाखो रुपयांची विकास कामे लोकसहभागातून केली आहेत. ६० गावांमधून सर्वाधिक स्वच्छता आणि अन्य सुविधा राबविल्यामुळे बोरगावने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला. या गावच्या स्पर्धेत असलेल्या सांडगेवाडी गावाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. बनेवाडी आणि बाणूरगड या दोन्ही गावांना तृतीय क्रमांक विभागून दिला आहे.
लाडेगाव, लंगरपेठ, बावची ग्रामपंचायतींनाही पुरस्कार
घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी देण्यात येणारा वसंतराव नाईक पुरस्कार लाडेगाव ता.वाळवा ग्रामपंचायतीने, तर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार लंगरपेठ ता.कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीने मिळविला आहे. शौचालय व्यवस्थापनाचा आबासाहेब खेडकर पुरस्कार बावची ता.वाळवा ग्रामपंचायतीने पटकविला आहे. या पुरस्काराची घोषणा मुख्य कार्यकारी अधकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली.