सराफास पावणेसहा लाखांना लुटले
By admin | Published: November 2, 2014 12:38 AM2014-11-02T00:38:56+5:302014-11-02T00:39:25+5:30
बेदम मारहाण : अंकली-मिरज रस्त्यावरील घटना; चार लुटारुंचे पलायन
मिरज : अंकली-मिरज रस्त्यावर शुक्रवारी रात्री चौघांनी अथणी येथील सराफ व्यावसायिक विनोद शिवाजी साळुंखे (वय २५) यांच्यासह तिघांना मारहाण करून चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा पावणेसहा लाखांचा ऐवज लुटला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.
विनोद साळुंखे यांचे अथणी येथे ‘रवळनाथ ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. लहान भाऊ महेश साळुंखे, मामा दशरथ किसन लिगाडे यांच्यासोबत साळुंखे शुक्रवारी हुपरी येथे चांदीचे दागिने आणण्यासाठी गेले होते. एमएच ११ बीएच २११२ क्रमांकाच्या मोटारीतून तिघेही मिरजेकडे येत असताना रात्री आठ वाजता अंकलीजवळ मोटारीतून (क्र. एमएच ०४ बीएच ०५१५) आलेल्या चौघांनी साळुंखे यांची मोटार अडवली. ‘पाठीमागे एका मुलीला उडवून पुढे आला आहेस’, असे सांगत चौघांनी मोटार चालविणाऱ्या विनोद साळुंखे यांना मारहाण करून गाडीची किल्ली काढून घेतली.
साळुंखे यांचे मामा दशरथ लिगाडे गाडीतून उतरल्यानंतर चोरट्यांनी त्यांनाही माराहाण केल्याने ते रस्त्यालगत उसात गेले. चोरट्यांनी साळुंखे यांची मोटार ताब्यात घेऊन विनोद साळुंखे व महेश साळुंखे यांना मिरजेच्या दिशेने पुढे आणले. मोटार अंधारात थांबवून दोघांना मारहाण करत गावठी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याजवळील नऊ किलो चांदीचे दागिने, विनोद साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील ब्रेसलेट, रोख ८० हजार असा ५ लाख ७२ हजाराचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.
विनोद व महेश यांच्या डोक्यात गावठी पिस्तुलाच्या दस्त्याने मारहाण करण्यात आली. दोघांचे हातपाय बांधून मोटारीतून मिरजेत आणण्यात आले. मिरजेत शास्त्री चौकातून शिरोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारीत महेश यांना बांधलेल्या अवस्थेत सोडण्यात आले. विनोद साळुंखे यांना चोरट्यांनी आपल्या मोटारीत घालून शिरोळमार्गे धरणगुत्ती येथे नेऊन उसाच्या शेतात टाक ले.
चोरटे दागिने व रोख रक्कम घेऊन फरारी झाले. साळुंखे यांचे मामा दशरथ लिगाडे व मिरजेत मोटारीत बांधून ठेवलेले महेश साळुंखे हे इतरांच्या मदतीने मिरजेत पोलीस ठाण्यात पोहोचले.
जबरी चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शिरोळ रस्त्याने चोरट्यांचा शोध घेतला. मात्र चोरटे सापडले नाहीत. अंकली-मिरज रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असताना चोरट्यांनी मारहाण करून सराफास लुटल्याने खळबळ उडाली. जबरी चोरीबाबत विनोद साळुंखे यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस प्रमुख सावंत यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
लुटारु तरुण; मराठीत बोलणारे
मराठी बोलणारे चोरटे पॅन्ट, शर्ट अशा पोशाखात होते. चौघेही तरुण होते. साळुंखे यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग करून त्यांना लुटल्याचा पोलिसांचा संशय आहे. मोटारीच्या क्रमांकावरून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. (वार्ताहर)