Bull Cart Race: बैलगाडी शर्यतीत सर्जा-राजाचा पुन्हा छळ, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:11 PM2022-06-11T16:11:51+5:302022-06-11T16:12:53+5:30

शर्यतींसाठी पोलीस बंदोबस्त आणि छायाचित्रण असतानाही असे प्रकार सर्रास सुरु

Sarja-Raja persecution again in bullock cart race | Bull Cart Race: बैलगाडी शर्यतीत सर्जा-राजाचा पुन्हा छळ, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी

Bull Cart Race: बैलगाडी शर्यतीत सर्जा-राजाचा पुन्हा छळ, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी

Next

संतोष भिसे

सांगली : बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळून वर्षही झाले नाही, तोपर्यंतच गाडीवानांमधील विकृतींनी उचल खाल्ली आहे. बैलांना शॉक देणे, काठीने झोडपणे, दुचाकीने गाडी ढकलणे, शेपटीचे चावे असे प्रकार सुरु झाले आहेत. शर्यतींसाठी पोलीस बंदोबस्त आणि छायाचित्रण असतानाही असे प्रकार सर्रास सुरु असल्याने प्रशासनाचेही छुपे सहकार्य असल्याची शंका निर्माण होत आहे.

बैलांना पळविण्यासाठी बॅटरीचा वापर ही बाब सर्वात गंभीर ठरली आहे. जोराचा शॉक देणारी चार्जिंगची बॅटरी हजार-बाराशे रुपयांना मिळते. म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकजण तयार करतो. मागणी वाढल्याने अन्यत्रही निर्मिती सुरु झाली आहे. बॅटरीला तारा आणि लोखंडी रिंग असते. त्याद्वारे शॉक दिल्यावर बैल जोराने पळतो.

असे चालतात गैरप्रकार

  • चार्जिंगच्या छोट्या बॅटरीने बैलांना शॉक
  • बैलांच्या शेपट्या पिरगाळणे, चावणे
  • एकाच गाडीवानाला परवानगी असताना दोघेजण बसणे
  • शर्यतीच्या मार्गावर दुचाकी घालणे
  • एक किलोमीटर अंतराची मर्यादा असताना येता-जाता दोन किलोमीटर पळविणे
     

प्रशासनाचे छुपे सहकार्य ?

छोट्या शर्यतीवेळी अनेकदा पोलिसांची अनुपस्थिती असते. शर्यतींचे ड्रोनद्वारे उंचावरून छायाचित्रण होत असल्याने शॉकसारखे गैरप्रकार दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिक महसूल प्रशासनाची संयोजकांशी हातमिळवणीची झाल्याची शंका निर्माण होते. नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांची अनामत जप्त करण्याची तरतूद आहे, पण आजपावेतो एकाही अनामत जप्तीचे उदाहरण नाही.

जिल्ह्यात विनापरवाना शर्यतींना ऊत

शर्यतीसाठी ५० हजार रुपये अनामत, पंधरा दिवस अगोदर अर्ज अशा अटी आहेत. संयोजकांना त्या जाचक वाटत असल्याने परवानगीविनाच शर्यती सुरु जात आहेत. विशेषतः सीमावर्ती गावात पहाटे झुंजूमुंजूलाच शर्यती सोडल्या जातात. गाव जागे होईपर्यंत संपलेल्या असतात. या शर्यतींमध्ये बैलांचा छळवाद मोठ्या प्रमाणात होत आहे.


मोठे बक्षीस, मोठा छळ

  • न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेक वर्षे शर्यती बंद होत्या. आता परवानगीमुळे जत्रा-यात्रा आणि नेतेमंडळींच्या वाढदिवसानिमित्त लाखोंच्या बक्षिसांची मैदाने रंगत आहेत.
  • बक्षीस जितके मोठे, तितका सर्जा-राजाचा छळ जास्त असा अनुभव आहे. एरवी बैलांना मुलापेक्षा लळा लावणारे गाडीवान शर्यतीवेळी राक्षसी का बनतात? हे कोडे असे ठरले आहे.

 

शर्यतींमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. विनापरवाना शर्यतींचे प्रमाणही मोठे आहे. अनामत जप्तीचे राज्यात एकही उदाहरण अद्याप नाही, यावरुन काळेबेरे स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या पीठासनापुढे पुन्हा बाजू मांडणार आहोत. बैलांवरील अत्याचार सादर करणार आहोत.  - अनिल कटारीया, बैलगाडी शर्यतीविरोधी याचिकाकर्ता
 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत आतापर्यंत फक्त सुमारे वीस अधिकृत शर्यती झाल्या आहेत. उर्वरित सर्व शर्यती बेकायदेशीर व विनापरवाना आहेत. संघटनास्तरावर यावर निर्बंधांसाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाची परवानगी तात्पुरती आहे. प्रशासनाकडून नकारात्मक अहवाल गेला, तर शर्यती पुन्हा बंद पडतील. बेकायदेशीर शर्यती रोखण्यासाठी पोलिसांनीही गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे, - बाळासाहेब पाटील, सचिव, पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी रेसिंग असोसिएशन,

शर्यती नियमानुसारच घ्याव्यात यासाठी आम्ही सर्व संयोजकांना वेळोवेळी आवाहन केले आहे, पण गैरप्रकार सुरूच आहेत. सांगली जिल्ह्यात याचे प्रमाण जास्त आहे. बैलांचा छळवाद सुरूच राहिला, तर शर्यतींवर पुन्हा निर्बंध येऊ शकतात, याचे भान संयोजकांनी राखायला हवे.  - नारायण गाडगीळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शाहू पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी रेसिंग असोसिएशन,

शर्यतीला तहसीलदार आणि सक्षम पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. व्हिडिओ छायाचित्रणही होते. नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जातील. परवानगीनिशी घेतलेल्या शर्यतीत नियम उल्लंघनाच्या तक्रारी नाहीत. - समीर शिंगटे, प्रांताधिकारी, मिरज

Web Title: Sarja-Raja persecution again in bullock cart race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.