सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:11 PM2022-03-09T14:11:15+5:302022-03-09T14:12:34+5:30

बँकेतील ३० कोटी ७८ लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष संजय नाईक यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा ६५ जणांविरुद्ध शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Sarjeravdada Naik Co-operative Bank License Revoked, RBI Action | सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई

सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई

googlenewsNext

शिराळा : येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. सहकार आयुक्तांनी उपनिबंधक डी. एस. खटाळ यांची अवसायकपदी नियुक्ती केली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसून, कमाईची शक्यता नाही. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही, या कारणांमुळे परवाना रद्द करत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या मुख्य महाप्रबंधक मोनिषा चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.

बँकेतील ३० कोटी ७८ लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष संजय नाईक यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा ६५ जणांविरुद्ध शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दि. २ एप्रिल २०११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान ठेवींच्या व सभासद भागभांडवलाच्या रकमेतील रोख शिल्लक रकमेतून १ कोटी ३ लाख ८१ हजार ६०४ रुपयांचा अपहार, बँकेच्या सांगलीतील महावीरनगर शाखेतून बेकायदेशीरपणे आरटीजीएस करून ८ लाख रुपयांचा अपहार, विनातारणी, जामीनकी व शेती कर्जातून २८ कोटी ६७ हजार ३९ हजार १८६ रुपयांचा, तर बँकेच्या मलकापूर शाखेतून वाहन तारण कर्जातून १२ लाख २८ हजार ५०० रुपयांचा अपहार, स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष मूल्यांकनापेक्षा जादा मूल्यांकन वाढवून १ कोटी ९८ लाख ६० हजार ६२४, असा एकूण ३० कोटी ७८ लाख २८ हजार ३१० रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

विमा कंपनीने आतापर्यंत ६४.७० कोटी रुपये ठेवीदारांना दिले आहेत. विमा कंपनीकडून दावे दाखल केलेल्या रकमा देण्याव्यतिरिक्त ठेवी स्वीकारणे, परत देणे असे व्यवहार बँकेला करता येत नाहीत. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासकाची नेमणूक झाली होती. आता परवाना रद्द झाल्यामुळे अवसायकांची नेमणूक झाली आहे. यापुढे या विभागाच्या कायद्यानुसार वसुली, लिलाव आदी प्रक्रिया सुरू होणार आहे. सभासदांचे भागभांडवल आता बुडाले आहे.

रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध संपले आहेत. आदेशानुसार अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे कर्ज वसुली, लिलावप्रक्रिया आदी व्यवहार सहकार विभागाच्या नियमानुसार करण्यात येणार आहेत. - डी. एस. खताळ, अवसायक तथा उपनिबंधक (सहकार), शिराळा

Web Title: Sarjeravdada Naik Co-operative Bank License Revoked, RBI Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.