कमिशन बुडाल्याने सरपंच शेगुणशेची पोटदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:20+5:302021-09-22T04:30:20+5:30
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सावळी (ता. मिरज) येथील जमीन खरेदी व्यवहारात कानडवाडीचे सरपंच अनिल शेगुणशे दोन ...
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सावळी (ता. मिरज) येथील जमीन खरेदी व्यवहारात कानडवाडीचे सरपंच अनिल शेगुणशे दोन कोटी ४७ लाख रुपयांचे कमिशन बुडाले. त्यामुळेचे निवडणुकीच्या तोंडावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचे प्रत्युत्तर बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब कोरे व वसंतराव गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.
संचालक कोरे म्हणाले, सांगली बाजार समितीने यापूर्वी जमीन-विक्री होती. त्यामुळे नवीन जागा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यादरम्यान सावळी येथील जमीन खरेदीसाठी २०१७ मध्ये करार झाला होता. तेव्हा करारावर सरपंच शेगुणशे यांनी साक्षीदार म्हणून सही केली आहे. सुरुवातीला प्रति एकर ८१ लाख ६० हजार रुपये प्रमाणे १३ एकर जमिनीचा आणि रस्त्यासाठी प्रति एकर एक कोटी तीन लाख रुपयाप्रमाणे करार झाला. परंतु ही जमीन महाग असल्याचे संचालक मंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे करार रद्द केला. अनामत रक्कम परत घेतली. करार रद्द केल्यामुळे सरपंच शेगुणशे यांची दोन कोटी ४७ लाख रुपयांचे कमिशन बुडाले, तर बाजार समितीची ही रक्कम वाचली. दिलेली अनामत रक्कमही परत घेण्यात आली. तीच जमीन थेट शेतकऱ्यांकडून ६९ लाख ५० हजार प्रति एकर या दराने बाजार समितीने कमी दरात खरेदी केली आहे. बाजार समितीने सावळी येथील जमीन खरेदीसाठी सर्व शासकीय परवानगी घेतली आहे. पणनमंत्री यांच्या आदेशाने जमिनीचा व्यवहार झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे. २०१८ मध्ये जमीन खरेदीवेळी दलाली बुडाल्यामुळे शेगुणशे यांची पोटदुखी वाढली आहे. बाजार समितीच्या निवडणुका येत्या काही काळामध्ये होणार आहेत, अशावेळी बिनबुडाचे आरोप करून संचालकांची बदनामी करण्याचा डाव सुरू आहे. परंतु आम्ही पारदर्शक कारभार केल्यामुळे आम्हाला चौकशीची कोणतीही भीती नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी बाजार समिती संचालक जीवन पाटील, बाळासाहेब बंडगर, अजित बनसोडे उपस्थित होते.
चौकट
पारदर्शक व्यवहाराने नुकसान टाळले : दिनकर पाटील
बाजार समितीने पारदर्शकपणे जमिनीचा व्यवहार करून आम्ही नुकसान टाळले आहे. आताही चौकशीला सामोरे जाऊन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.