कोरोना मृतावर अंत्यसंस्कारासाठी सरपंचांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:27+5:302021-06-05T04:20:27+5:30
मालगाव : सलगरे (ता. मिरज) गावचे सरपंच तानाजी पाटील कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारांसाठी स्वत:च पुढाकार घेत आहेत. सुरक्षिततेची काळजी घेत ...
मालगाव : सलगरे (ता. मिरज) गावचे सरपंच तानाजी पाटील कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारांसाठी स्वत:च पुढाकार घेत आहेत. सुरक्षिततेची काळजी घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेमधून बाहेर काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे काम ते करीत आहेत.
सरपंच पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विलगीकरण कक्ष व गावात २५ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सुरू करून गोरगरिबांना आधार दिला आहे. विलगीकरण कक्षासह कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डाॅक्टरांच्या उपचाराने आतापर्यंत १५०हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. चांगल्या सुविधा व उपचाराने मृत्यू दर शून्य राहिला.
सलगरेबाहेरच्या विविध रुग्णालयांत उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर गावात अंत्यसंस्कारास सहमती मिळत असली तरी कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोणी करायचे, हा प्रश्न होता. अशावेळी सरपंच पाटील संकटातील कुटुंबाच्या मदतीला धावत आहेत. सुरक्षिततेची काळजी घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेमधून बाहेर काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचे काम ते करीत आहेत.
चौकट
मोफत अंत्यसंस्काराची सोय
कोरोनाने मृत झाल्यास सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण स्वत: अंत्यसंस्कार करतो. ग्रामपंचायतीतर्फे कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्काराची मोफत सोय केल्याचे सरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले.