जयंतराव गटाच्या माघारीने ‘सर्वोदय’ बिनविरोध
By admin | Published: June 7, 2017 12:11 AM2017-06-07T00:11:42+5:302017-06-07T00:11:42+5:30
जयंतराव गटाच्या माघारीने ‘सर्वोदय’ बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. जयंत पाटील गटाने मैदानातून माघार घेतल्याने, केवळ संभाजी पवार गटाच्याच पॅनेलचे अर्ज दाखल झाले. यातील ब वर्ग व महिला गटातील तीन सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून छाननीनंतर पवार गट संचालकांची नावे जाहीर करणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांच्या संघर्षाच्या कहानीमुळे संपूर्ण राज्यात कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय कारखान्याचा वाद गाजत आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सध्या या कारखान्याचा ताबा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू कारखान्याकडे आहे. कारखान्याला अडचणीच्या काळात आर्थिक मदत केल्यानंतर ताबा ‘राजारामबापू’कडे गेला होता. ताब्यावरून जयंत पाटील यांच्यावर पवार गटाने अनेकदा टीका केली. दोन्ही गटांचा न्यायालयीन संघर्षही सुरू आहे. त्याचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.
वादामुळे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र जयंत पाटील गटाने निवडणुकीचे मैदान न लढविण्याचा निर्णय घेतला होता. कारण निवडणूक न लढविताही कारखाना त्यांच्याच ताब्यात राहणार असल्याचे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे निवडणूक औपचारिकता बनली.
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केवळ पवार गटाचेच ३५ अर्ज दाखल झाले. परिणामी निवडणूक बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब झाले. अर्जांची छाननी बुधवारी, ७ जूनरोजी होणार आहे. त्यानंतर राहिलेल्या अर्जांमधून संचालकांची नावे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यामार्फत जाहीर केली जाणार आहेत.
----
यांचे अर्ज दाखल...
आष्टा उत्पादक गटातून दौलत थोटे, लक्ष्मण धनगर, आप्पासाहेब थोटे, संभाजी पाटील, पोपट शळके, बावची गटातून प्रकाश जाधव, बाजीराव पाटील, राजाराम पाडळकर, छायादेवी बारवडे, नितीन बारवडे, रणजित थोरात, तुंग गटातून आप्पासाहेब काटकर, तात्यासाहेब तामगावे, सनतकुमार आडमुठे, भरत साजणे, माणिक आवटी, शीतल आप्पासाहेब पाटील, महावीर चौगुले, शीतल भूपाल पाटील, हरिपूर गटातून महावीर चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, पृथ्वीराज पवार, संभाजी पवार, नरवाड गटातून सागर पाटील, पवनंजय पाटील, राजकुमार पाटील, विष्णू पाटील, विकास पाटील, बाळकृष्ण पाटील, इतर मागासवर्ग गटातून हाशमुद्दीन मुलाणी, भटक्या विमुक्त जाती, जमातीतून लक्ष्मण बिरू धनगर, पोपट शेळके यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
बिनविरोध झालेले संचालक
बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था गटातून शलाका सतीश पवार, महिला गटातून सुमन पाटील आणि सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली.