मिरजेतील सतार, तानपुऱ्याची तार जीआय मानांकनाने छेडली; केंद्र शासनाकडून सन्मानामुळे लौकिकामध्ये भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:43 PM2024-04-01T17:43:07+5:302024-04-01T17:43:26+5:30
परदेशी कलाकारांकडून कलेला दाद
मिरज : मिरजेतील सतार व तानपुरा या तंतुवाद्यांना केंद्र शासनाकडून जीआय (भौगोलिक ओळख) मानांकन मिळाले आहे. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तांतुवाद्यांना प्रथमच भौगोलिक ओळख मिळाली आहे. यामुळे या संगीत वाद्यांना पारंपरिकता व विशिष्ट गुणवत्ता लाभली आहे.
तांतुवाद्यांना जीआय मानांकन मिळाल्याने मिरजेतील तंतुवाद्यांची इतरांना नक्कल करता येणार नाही. इतर ठिकाणची वाद्ये मिरजेच्या नावाने विक्री करता येणार नाहीत. यामुळे मिरजेतील तंतुवाद्यांना देशात व परदेशात निर्यातीसाठी फायदा होऊन तंतुवाद्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याचे ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले.
मिरज म्युझिकल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर तसेच मिरज सितार व सोलटुन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर या संस्थांच्या मिरज तानपुरा वाद्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मानांकन मिळवण्यासाठी नाबार्ड, हस्तकला विभाग कोल्हापूर, उद्योग विभाग सांगली यांचे सहकार्य लाभले. जीआय तज्ज्ञ डॉ. रजनीकांत यांच्या संस्थेच्या माध्यमातून जीआय मानांकनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रस्तावाची पडताळणी होऊन मिरजेत निर्मिती होणाऱ्या या तंतुवाद्यांना ३० मार्च रोजी जीआय मानांकनाची नोंदणी मिळाली.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांना वाद्यपुरवठा
मिरज शहर हे तंतुवाद्यांचे माहेरघर आहे. मिरजेतील तंतुवाद्यांची निर्मिती जगभर प्रसिद्ध असून तंतुवाद्य निर्मात्यांच्या अनेक पिढ्या येथे अद्याप या व्यवसायात कार्यरत आहेत. शेकडो कुटुंबे या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांना मिरजेतून तंतुवाद्ये निर्माण करून देणाऱ्या कारागिरांनी मिरजेचा नावलौकिक सातत्याने वाढविला आहे. यावेळी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर, सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कंपनीचे अध्यक्ष मुबीन मिरजकर, संचालक अल्ताफ पिरजादे, बाळासाहेब मिरजकर, फारुक सतरमेकर, नासीर मुल्ला, रियाज सतारमेकर उपस्थित होते.
परदेशी कलाकारांकडून कलेला दाद
दर्जेदार, नावीन्यपूर्ण वाद्ये तयार करून मिरजेतून परदेशात पाठविण्यात येतात. अनेक परदेशी कलाकार खास तंतुवाद्य निर्मिती पाहण्यासाठी दरवर्षी मिरजेला भेट देत असतात. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरजेच्या या व्यवसायाबद्दल कलाकारांत आकर्षण आहे.
तंतुवाद्य निर्माते, कारागिरांना तसेच व्यवसायाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी जीआय मानांकनामुळे हातभार लागणार आहे. यापुढील काळात मिरजेतील इतर वाद्यांनाही जी.आय. मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मानांकनामुळे मिरजकर म्हणून आम्हाला मोठा आनंद झाला आहे. - बाळासाहेब मिरजकर, ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते, मिरज