साताऱ्यात बंद कडकडीत पाळणार
By admin | Published: June 4, 2017 11:06 PM2017-06-04T23:06:07+5:302017-06-04T23:06:07+5:30
साताऱ्यात बंद कडकडीत पाळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्य शासनाने शेतकरी विरोधी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सोमवारी सातारा बंद पाळण्यात येणार आहे. या बंदला सर्व क्षेत्रांतील लोकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेतकरी-कामगार संयुक्त कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कृती समितीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सातारा बंद
पाळण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी साडेनऊला गांधी मैदानापासून पदयात्रा काढण्यात येणार आहे. राजवाडा ते मोती चौक-कर्मवीर भाऊराव पाटील मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप होईल. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने शेतमाल, दूध सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे. कऱ्हाड येथे महात्मा गांधी पुतळा, कोल्हापूर नाका येथून पदयात्रेस प्रारंभ होऊन यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थानावर समारोप होणार आहे.
बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, किसान क्रांती संघटना, किसान सभा, सर्व श्रमिक पेन्शनर्स संघटना, सर्व श्रमिक गिरणी कामगार संघटना, सिटू, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
अर्जुन साळुंखे, राजू शेळके, कॉ. विजय निकम, अलीभाई इनामदार, कॉ. वसंतराव नलवडे, कॉ. अस्लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, कॉ. शंकर पाटील, रमेश पिसाळ, शाम चिंचणे, जयवंत बोडके, मोहन साबळे, संजय साबळे, भानुदास साबळे, चंद्रकांत खंडाईत, राजेंद्र साबळे, सलीम आतार बैठकीस उपस्थित होते. बळिराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील कऱ्हाडहून दूरध्वनीद्वारे चर्चेत सहभागी झाले होते.
या बंदला सातारकरांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
आठवडा बाजारावर शेतकऱ्यांचा बहिष्कार
सातारा : नोकरदारांच्या साप्ताहिक सुटीदिवशी रविवारी भरणारा आठवडा बाजार सर्वच व्यावसायिकांसाठी कमाईचा असतो. पण, या बाजारांवर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला. सर्वच ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता.
जिल्ह्यातील सातारा, खंडाळा, लोणंद, कातरखटाव, मायणी, वाठार किरोली, साप, उंडाळे, पिंपोडे बुद्रुकबरोबरच अनेक मोठ्या शहरांमध्ये रविवारी आठवडा बाजार असतो.