सातारा-कोल्हापूर डेमू पॅसेंजर कोरेगावजवळ पडली बंद, प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 01:34 PM2024-08-06T13:34:06+5:302024-08-06T13:34:40+5:30

एसटीची बेफिकिरी

Satara-Kolhapur DEMU passenger stalled near Koregaon, passengers suffering | सातारा-कोल्हापूर डेमू पॅसेंजर कोरेगावजवळ पडली बंद, प्रवाशांना मनस्ताप

सातारा-कोल्हापूर डेमू पॅसेंजर कोरेगावजवळ पडली बंद, प्रवाशांना मनस्ताप

सांगली : सातारा-कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन बंद पडल्याने सोमवारी सकाळी चार तास उशिरा कोल्हापुरात पोहोचली. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेकडो नोकरदारांना कामावर हाफ डे टाकावा लागला. महिला कामगारांनी अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करून कोल्हापूर गाठले. रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

सातारा ते कोल्हापूर डेमू पॅसेंजरच्या इंजिनातील मोटर बंद पडली. त्यामुळे गाडी रहिमतपूर ते कोरेगावदरम्यान अडकून पडली. चालकांनी दुरुस्तीचे बरेच प्रयत्न केले, मात्र बिघाड दूर झाला नाही. अखेर दुसरे इंजिन बोलावून घेऊन त्याने खेचून डेमू मार्गस्थ करण्यात आली. या खटाटोपात चार तास उशीर झाला. सकाळी साडेआठ वाजता मिरजेत येणारी पॅसेंजर दुपारी सव्वाबारा वाजता आली. हातकणंगलेत एक वाजता, तर कोल्हापुरात पावणेदोन वाजता पोहोचली. कोल्हापुरातून चार तास विलंबाने म्हणजे दुपारी दोन वाजता तिची परतीची फेरी सुरू झाली.

सातारा ते कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या लाल डेमूविषयी प्रवाशांच्या प्रचंड तक्रारी आहेत, पण त्यांची दखल रेल्वे प्रशासनाने कधीच घेतलेली नाही. ही गाडी वारंवार बंद पडते. तिची धावण्याची गतीही प्रतितास सरासरी ३० ते ४० किलोमीटर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो. या पॅसेंजरने दररोज हजारो प्रवासी सातारा, सांगली, मिरज, जयसिंगपुरातून कोल्हापूरला जातात. विद्यार्थी, नोकरदारांसाठी ही गाडी अत्यावश्यक आहे. मात्र, तिचा सततचा बिघाड प्रवाशांसाठी डोकेदुखी बनला आहे.

शेकडो नोकरदारांचा हाफ डे

डेमू उशिरा आल्याने प्रवाशांना पावणेअकरा वाजताच्या गोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेसपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे कामावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना हाफ डे टाकावा लागला.

एसटीची बेफिकिरी

डेमू चार तास लेट होणार असल्याचे स्पष्ट होताच मिरजेत महिलांनी एसटी स्थानक गाठले. अर्ध्या तिकिटात कोल्हापूरला जाण्यासाठी स्थानकात प्रचंड गर्दी केली. पण सकाळी साडेआठ ते नऊदरम्यान अवघ्या दोनच गाड्या कोल्हापूरसाठी उपलब्ध होत्या. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त गाडी सोडण्याची सतर्कता आगार व्यवस्थापनाने दाखविली नाही.

Web Title: Satara-Kolhapur DEMU passenger stalled near Koregaon, passengers suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.