प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 08:17 PM2024-08-06T20:17:53+5:302024-08-06T20:18:23+5:30

मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील : १३ ऑगस्टपर्यंत दररोज फेऱ्या.

Satara Kolhapur special train will run due to flood situation | प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

अविनाश कोळी/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. बुधवारी ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत सातारा-सांगली-कोल्हापूर विशेष रेल्वे गाडी दररोज धावणार आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २० जुलैपासून कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा नद्या भरून वाहत आहेत. तिन्ही जिल्ह्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली आहेत. सध्या पूर ओसरत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पुराच्या काळात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या. अजूनही काही मार्गावर फेऱ्या बंद आहेत.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात अशीच पुरस्थिती झाल्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने चार संपर्क क्रांती व ईतर १० रेल्वे गाड्यांना उगारखुर्द व कुडची स्थानकांवर थांबा दिला होता. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी संपर्क क्रांती गाड्या सांगली, भिलवडी, कराड व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबवाव्या तसेच किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे आणखी दहा गाड्यांना थांबा देण्याची विनंती सांगली जिल्हा नागरीक जागृती मंचने केली होती. पण मध्य रेल्वेने काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मंचने पंतप्रधानांकडे ऑनलाईन तक्रार केली. त्यावर रेल्वे विभागाने सातारा-सांगली-कोल्हापूर पूर विषेश रेल्वे गाडी सुरू केल्याचे सांगितले.

अशी धावणार सातारा-कोल्हापूर गाडी (क्र. ०१४१२)

सातारा दुपारी २:२०, कोरेगाव २.३३, रहीमतपूर २.४३, तारगाव २.५३, मसूर ३.०५, शिरवडे ३.१५, कराड ३.२५, शेणोली ३.३८, भवानीनगर ३.४५, ताकारी ३.५०, किर्लोस्करवाडी ४, भिलवडी ४.१५, नांद्रे ४.२३, सांगली ४.३८, विश्रामबाग ४.४३, मिरज सायं. ५.२०, जयसिंगपूर ५.३५, हातकणंगले ५.५०, रुकडी ६, वळिवडे ६.०६, कोल्हापूर सायंकाळी ६.३५
चौकट

अशी धावणार कोल्हापूर-सातारा गाडी (क्र. ०१४११)
कोल्हापूर सकाळी ८.४०, वळीवडे, ८.४८, रुकडी ८.५५, हातकणंगले ९.०५, जयसिंगपूर ९.२०, मिरज सकाळी ९.४५, विश्रामबाग ९.५३, सांगली १०, नांद्रे १०.१५, भिलवडी १०.२५, किर्लोस्करवाडी १०.४०, ताकारी १०.५०, भवानीनगर १०.५५, शेणोली ११.०५, कराड ११.२५, शिरवडे ११.३५, मसूर ११.५०, तारगाव दुपारी १२, रहीमतपूर, १२.१०, कोरेगाव १२.२५, सातारा १,३५

सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा तसेच सांगली रेल्वे स्टेशनवर या गाडीची येण्याची वेळ सोयीस्कर असल्याने सांगली स्टेशन जवळील मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. सर्व थांबे दिल्याने विश्रामबागपर्यंत येणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचीही सोय होणार आहे

- सतीश साखळकर, अध्यक्ष नागरिक जागृती मंच

Web Title: Satara Kolhapur special train will run due to flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.