राजकीय संघर्षात सातारारोडची ससेहोलपट!

By admin | Published: June 28, 2015 11:38 PM2015-06-28T23:38:03+5:302015-06-28T23:38:03+5:30

डोकेदुखी वाढली : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; पोलीस दूरक्षेत्र मजबुतीकरणाची गरज

Satararodite political struggle | राजकीय संघर्षात सातारारोडची ससेहोलपट!

राजकीय संघर्षात सातारारोडची ससेहोलपट!

Next

कोरेगाव : ब्रिटीशकाळापासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या सातारारोडची वाटचाल संवेदनशीलतकडे सुरु आहे. सातत्याने भांडणे आणि तणाव यामुळे सातारारोड पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी बनत असून, नागरिकांचे जीवनमानही बदलत चालले आहे. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने या गावाचे रुपडे पालटू शकलेले नाही. अनेक वर्षांपासून असलेल्या पोलीस दूरक्षेत्राच्या मजबुतीकरणाबरोबरच तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्यावाढविण्याची गरज आहे. मुंबई इलाख्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सर धनजीशा कूपर यांनी रेल्वेमार्गाचे नेटवर्क पाहून सातारारोड येथे नांगर कारखाना उभा केला. कालांतराने त्यामध्ये भरभराट होत गेली आणि सातारारोड ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांनीही सातारारोडला काही काळ वास्तव्य केले होते. १९७० च्या दशकामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सातारारोड येथील रेल्वेस्थानक बंद करत रेल्वेमार्ग बदलला आणि तो साताऱ्यासाठी क्षेत्रमाहुली येथे नेला. त्यानंतर सातारारोडची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. कूपर यांची एकमेव फौंड्री तेथे राहिली. कूपर यांच्याकडून ती शेठ वालचंद हिराचंद यांच्या समूहाने विकत घेतली आणि त्याचे नामकरण वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड असे झाले. या कारखान्यातील कामगार युनियनसह अन्य संस्थांमुळे सातारारोडची राजकीय हालचाल वाढू लागली आणि तेथून युनियनवाद आणि राजकीय चढाओढ यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस असा संघर्ष गेले काही वर्षे या गावात पाहावयास मिळत आहे.
युनियन वादातून आणि वाळूच्या कारणावरुन गेल्या दोन ते तीन वर्षात सातारारोडमध्ये तणावपूर्ण
परिस्थिती अनेकवेळा राहिली आहे. राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने प्रशासन या गावाकडे अपेक्षेएवढे
लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत
आहे. (प्रतिनिधी)

स्वतंत्र उपनिरीक्षक हवा...
सातारारोड येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दूरक्षेत्र आहे. त्यासाठी स्वतंत्र इमारत व मोठा परिसर आहे. या दूरक्षेत्रासाठी आवश्यक ते अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दलाकडून देण्यात येत नसल्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी तेथे काम पाहत आहेत. सातारारोडसह पंचक्रोशीतील वीसहून अधिक गावांचा कारभार या दूरक्षेत्रातून चालत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस दलाच्या नियमाप्रमाणे तेथे स्वतंत्रपणे पोलीस उपनिरीक्षकाची नियुक्ती होणे अपेक्षित आहे; मात्र तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. वायदंडे यांची बदली झाल्यानंतर हे पदच रिक्त राहिले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने तेथे स्वतंत्र उपनिरीक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Satararodite political struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.