सत्तानाट्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 02:23 PM2019-11-25T14:23:15+5:302019-11-25T14:35:44+5:30
कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.
सांगली : राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार मुंबईतच अडकले असून, प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही तिथेच ठाण मांडले आहे. आमदारांना सांभाळताना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजकीय हालचालींवर नजर ठेवून सतत त्याची माहिती पक्षाला कळविण्याची सूचना दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठपैकी तीन जागा जिंकून राष्टÑवादीने क्रमांक एकची खुर्ची भाजपकडून ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचा आत्मविश्वास दुणावला आहे. अशा परिस्थितीत पक्षातील राज्यस्तरीय बंडामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादी हादरून गेली आहे. तरीही पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे असल्याने व जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत असल्याने येथील राष्टÑवादी एकसंधपणे शरद पवारांच्या बाजूने ठाम आहे. राष्टÑवादीच्या तिन्ही आमदारांना एकत्रित ठेवण्यात आले असून त्यात जिल्ह्यातील तिन्ही आमदारांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारीही मुंबईतच ठाण मांडून आहेत. राजकीय हालचालींवर त्यांना नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे भाजप, शिवसेना व काँग्रेसचे आमदारही मुंबईतच आहेत. प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या प्रमुखांना वरिष्ठांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.राज्यातील राजकीय घडामोडींना जसा वेग येईल, तसे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जिल्ह्याची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. येथील अनेक आमदार मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत.