अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी सांगली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:55 PM2019-02-15T13:55:09+5:302019-02-15T13:56:59+5:30
पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
सांगली : पुलवामा येथील भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक व सामाजिक संघटनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
शहरातील विविध राजकीय पक्ष, व्यापारी एकता असोसिएशन, व्यापारी संघटना, उद्योजक संघटना, पानपट्टी असोसिएशन, फेरीवाला संघटना, हॉटेल चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत अतिरेकी हल्ल्याचा निषेध व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी सांगली बंदचा निर्णय घेण्यात आला.
भारतीय जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांच्या पाठीशी प्रत्येक भारतीय ठामपणे उभा आहे. सीमेवर जवान अहोरात्र रक्षण करीत असल्यामुळेच सर्व भारतीय सुरक्षित आहेत. सेनेचे जवान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून त्यांचे योगदान कोणीच विसणार नाही. शहीद जवानांच्या कुटूंबाच्या दु:खात सांगलीकर सहभागी आहेत, अशी भावनाही प्रतिनिधींनी व्यक्त केली.
या घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता स्टेशन चौकात सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजकांनी उपस्थित रहावे. जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. व्यापारी, उद्योजकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
साडेदहा वाजता दोन मिनिटाचे मौन
जिल्हा प्रशासनाच्यावतीने साडेदहा वाजता सांगली शहरात भोंगा वाजविणार आहे. भोंगा वाजताच सर्वच नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनीही भोंगा वाजताच दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.