पावसाने सोयाबीन, बाजरीचे नुकसान

By admin | Published: September 22, 2016 12:47 AM2016-09-22T00:47:44+5:302016-09-22T00:47:44+5:30

आटपाडी, जत तालुक्यात जोरदार हजेरी : खानापूर, कडेगाव, शिराळा, मिरज तालुक्यात मध्यम पाऊस

Sausage, soybean and millet damage due to rain | पावसाने सोयाबीन, बाजरीचे नुकसान

पावसाने सोयाबीन, बाजरीचे नुकसान

Next

सांगली : सांगली-मिरज शहरांसह जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, जत तालुक्यात बाजरी पिकाची मळणी सुरू असतानाच पाऊस आल्याने बाजरी पीक भिजले. शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यांत सोयाबीन पीक भिजल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. रब्बी पेरणीसाठी हा पाऊस पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सांगली, मिरज शहरांसह परिसरात दुपारपासून पावसाने सुरुवात केली. अनेक भागामध्ये मुसळधार, तर बहुतांशी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सांगली-मिरज शहरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, गोमेवाडी, हिवतड परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. सध्या बाजरी, मका पिकाची काढणी सुरु असून, दुपारी तासभर झालेल्या पावसामुळे ही पिके भिजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जत शहर व परिसरात अर्धा तास दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बाजरी पिकाची काढणी सुरू असल्यामुळे ही पिके भिजली आहेत.
विटा शहरासह काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विटा शहरासह भाळवणी, कळंबी, पारे, बामणी, ढवळेश्वर, रेणावी आदी गावांसह तालुक्यात दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
शिराळा तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आहेत. या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र भात पिकास हा पाऊस उपयुक्त आहे. तालुक्यात आता सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आले आहे. शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सोयाबीन काढणी, मळणी करून रब्बी हंगामाची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. (प्रतिनिधी)
जतसह परिसरात दमदार पाऊस
जत : जत शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी तीन वाजण्याच्यादरम्यान वीस ते पंचवीस मिनिटे दमदार पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी उपयुक्त आहे. आठ दिवसांपासून पाऊस झाला नव्हता. दुपारी एक वाजल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दमदार पाऊस झाला. हा पाऊस पेरणीसाठी पोषक असला तरी, पाणी व चारा टंचाई कमी होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
कडेगावात रिमझिम
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वांगी, चिंचणी, अंबक, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, सोनकिरे, सोनसळ, शिरसगाव सह सर्वत्र पावसाची रिमझिम सुरू आहे. बुधवारी दुपारी चारपासून पाऊस सुरू झाला. यामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली. मागील काही दिवस पावसाने उघडीप दिली होती.

 

Web Title: Sausage, soybean and millet damage due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.