सावकाराकडे पाच लाखाच्या खंडणीची मागणी
By admin | Published: July 15, 2014 11:58 PM2014-07-15T23:58:03+5:302014-07-16T00:00:03+5:30
सांगलीतील प्रकार : व्यापाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा : कामगारास अटक
सांगली : सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन परवानाधारक सावकाराकडेच पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार आज (मंगळवार) रात्री उघडकीस आला. धीरजकांत सुभाषचंद्र गुप्ता (रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, वसंतदादा साखर कारखाना परिसर, सांगली) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय श्रीनारायण सारडा व प्रकाश मोहनलाल मुंदडा (वय ४२, रा. भारत कॉम्प्लेक्स, रतनशीनगर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुंदडा यास अटक करण्यात आली आहे. सारडा याची हरभट रस्त्यावर फोटो लॅब आहे. मुंदडा हा त्याच्या लॅबमध्ये कामाला आहे.
गुप्ता यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी सावकारीचा व्यवसाय बंद केला आहे. ते सावकारी करीत होते, त्यावेळी मुंदडाने त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या पैशाची त्याने परतफेड केली आहे. सध्या त्यांच्यात कोणताही आर्थिक व्यवसाय नव्हता. तरीही काही दिवसांपूर्वी सारडाने त्यांच्याशी संपर्क साधून, मुंदडा याने माझ्या लॅबमध्ये २० लाखांचा अपहार केला आहे. यातील पाच लाखांची रक्कम त्याने तुमच्याकडून घेतलेल्या पैशाचे व्याज देण्यासाठी तुम्हाला दिली आहे. ही रक्कम तुम्ही मला परत करा, अन्यथा तुमच्याविरुद्ध सावकारीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर गुप्ता यांनी सारडा यांना समजावले. मात्र तो काहीही ऐकत नव्हता. यामध्ये मुंदडाही सहभाग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे गुप्ता यांनी पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सावंत यांनी याप्रकरणी गुंडाविरोधी पथकास चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप बुवा यांनी चौकशी करुन आज गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)