घोटाळेबहाद्दरांच्या तावडीतून सांगली जिल्हा बँक वाचवा, शेतकरी संघटनांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
By अशोक डोंबाळे | Published: May 27, 2024 05:24 PM2024-05-27T17:24:16+5:302024-05-27T17:24:44+5:30
शासकीय अधिकाऱ्यांचेही दुष्काळ निधीच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष का?
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेच एकमेव आधार आहे. या बँकेला घोटाळेबहाद्दर कर्मचारी, अधिकाऱ्यापासून वाचवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष का ? असा सवालही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी शासनाकडून निधी मिळतो; पण शेतकऱ्यापर्यंत भरपाई जाण्यापूर्वीच त्यावर बँकेतील अधिकारी, कर्मचारीच डल्ला मारत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा बँकेतील हा घोटाळा उघडकीस आला, म्हणून दिसत आहे; पण जिल्हा बँकेबरोबरच अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमधील शासकीय निधीची शासनाकडूनच चौकशी केली तर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उजेडात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या घोटाळ्यात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
एटीएमचाही गैरवापर
जिल्हा बँकेच्या नियमानुसार एका एटीएमवरुन दिवसाला ३० हजार रुपये काढणे अपेक्षित आहे. तासगावमध्ये एका कर्मचाऱ्यानेच एटीएमवरुन ३० हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम काढली आहे. या बँकेच्या नियमाचा भंग झाल्यानंतर तातडीने शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही तरी निर्णय घेणे अपेक्षित होते. मुख्य कार्यालयाकडे तक्रार करणे अपेक्षित होते; पण याकडे शाखाधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.
निमणी शाखेतून नांद्रेच्या शाखेत पैसे वर्ग
जिल्हा बँकेच्या निमणी (ता. तासगाव) येथील शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी नांद्रे (ता. मिरज) शाखेत वर्ग करुन रोखीने पैसे काढल्याचे चौकशीत दिसून आले आहे. याप्रमाणे कुंभार यांनी आठ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग होऊनही शाखाधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा घोटाळा कसा आला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
कर्मचाऱ्यांकडून संगनमताने अपहार
शेतकऱ्यांना शासनाकडून शेतीच्या नुकसानभरपाई मिळते. या भरपाईच्या कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमताने परस्पर हडप केला आहे. यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी अपहारातील कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. सदरची रक्कम अपहार केलेल्या दिवसापासून व्याजासहित वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली.
राज्य शासनाने बँकेची चौकशी करावी : सुनील फराटे
राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या सर्व शाखांची सखोल चौकशी केली तर शासकीय अनुदानाचा मोठा घोटाळा उजेडात येणार आहे. म्हणून शासनाकडे जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी मागणी केली आहे. शासनाने चौकशी सुरु केली नाही तर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलनाचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला आहे.