सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावातून शिक्षकांचे आक्रोश आंदोलन; पुणे विभागातील शिक्षक संघ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय
By शीतल पाटील | Published: August 24, 2023 06:00 PM2023-08-24T18:00:47+5:302023-08-24T18:01:01+5:30
पुणे विभागातील जिल्हाध्यक्षांची बैठक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत झाली.
सांगली : राज्यातील अशैक्षणिक ऑनलाईन कामाला राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (सातारा) येथून शासनाविरोधात आक्रोश आंदोलन पुकारण्याचा निर्णय पुणे येथील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे विभागातील जिल्हाध्यक्षांची बैठक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिक्षकांनी राज्यभरातील अशैक्षणिक ऑनलाईन कामामुळे तसेच जिल्हा परिषदांच्या दप्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने आर या पारची भूमिका घ्यावी अशी मागणी थोरात यांच्याकडे केली. त्यानुसार नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाला अशैक्षणिक कामे मागे घेण्यास भाग पाडण्याचा निर्धारही संघटनेने व्यक्त केला.
यावेळी शिक्षक नेते बळवंत पाटील, महापालिका संघाचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सांगली जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रवी पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, अविनाश गुरव, सुनिल पाटील, सूर्यकांत डोगे, कोल्हापूर शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील एडके, हंबीरराव पवार, धनंजय नरुले उपस्थित होते.