सव्वाकोटी कागदपत्रे डिजिटल
By admin | Published: January 2, 2017 11:27 PM2017-01-02T23:27:24+5:302017-01-02T23:27:24+5:30
जिल्ह्यातील यंत्रणा बदलली : दाखले, नकाशांचा प्रवास सुलभ होणार
अविनाश कोळी ल्ल सांगली
विविधरंगी रुमालात गुंडाळलेली कागदपत्रे, त्यावर बसलेली धूळ, रेंगाळणारी दाखल्यांची प्रक्रिया आणि यासाठीच्या कटकटींमुळे महसुली विभागांपासून दूर पळणारी जनता असे वर्षानुवर्षाचे चित्र आता बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. ई-महाभूमीअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सव्वाकोटी कागदपत्रांना संगणकीय कपाट मिळाले आहे.
सांगलीच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये संगणकीकरणाची ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यात या प्रक्रियेच्या बाबतीत सांगली जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेबाबत अधिक गतीने पावले टाकल्यामुळे महत्त्वाच्या अभिलेखांचे आता संगणकीकरण झाले आहे.
राज्यात एकूण २६ कोटी ४१ लाख अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात येणार असून, यापैकी सांगली जिल्ह्यात सव्वा कोटी अभिलेखांचे स्कॅनिंग आणि नोंदी झाल्या आहेत. यामध्ये जुने सात-बारा, फेरफार उतारा, चालू खाते उतारा, कूळ नोंदवही, इनाम नोंदवही, तसेच भूमी अभिलेखकडील टिपण, आकारबंद, गुणाकार बुक, आकारफोड, कमी-जास्त पत्रक, मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही, मालमत्ता नोंदवही आदी कागदपत्रांचा समावेश आहे. असे बहुतांश अभिलेख आता संगणकीय कपाटात बंद झाले असून, ते लवकरच सर्वांसाठी कायमचे खुले होणार आहेत. विजयनगर येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातही यापुढे कागदपत्रांचे गठ्ठे कोठेही दिसणार नाहीत. तहसील कार्यालयांनाही अशाच आधुनिक अभिलेख कक्षांचे दर्शन घडणार आहे.
तालुकास्तरावर उदासीनता
संगणकीय अभिलेख तयार असताना विटा तहसील कार्यालय वगळता अन्य तालुकास्तरावरून ही प्रणाली सुरू करण्याबाबत उदासीनता दिसत आहे. यंत्रणा बदलली असल्याने, संबंधित कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आता जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे.
घरबसल्याही दाखले पाहणे शक्य
संपूर्ण राज्यातील तहसीलदार आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयाकडील महत्त्वाच्या व जुन्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे एकत्रीकरण करून ते संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात येणार असल्याने घरबसल्याही दाखले पाहता येऊ शकतील.
शासकीय यंत्रणेचे नियंत्रण
नोंदीची प्रक्रिया खासगी यंत्रणेमार्फत झाली असली तरी, त्यावर शासकीय अधिकाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण होते. पूर्ण खातरजमा झाल्यानंतरच तालुकानिहाय डाटा एकत्रिकरण करण्यात आले आहे.
तीन वर्षांपासून डाटा एन्ट्रीचे काम सुरू
गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भातील डाटा एन्ट्रीचे (दस्तांची संगणकीय नोंद) काम सांगलीत सुरू होते. फाटक्या कागदपत्रांच्या नोंदी करताना अनेक अडचणी आल्या होत्या.