सावळजच्या शाळेला नावीन्याचा ध्यास
By Admin | Published: March 27, 2016 11:33 PM2016-03-27T23:33:43+5:302016-03-28T00:09:45+5:30
जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा : दप्तराचे ओझे कमी करण्याचा आदर्शवत उपक्रमही सुरु
जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्येला गळती सुरू आहे, मराठी माध्यमांच्या शाळांतून पट टिकत नाही, अशी चर्चा होत असते. या चर्चा आणि समजुतीला सावळज येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकने छेद दिला आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या या बहुशिक्षकी शाळेत सद्य:स्थितीत साडेतीनशे विद्यार्थी आहेत. नावीन्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांकडून होणाऱ्या ज्ञानदानामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही ओढा कायम आहे. ही मोठ्या पटाची आणि बहुशिक्षकी शाळा डिजिटल करुन जिल्ह्यातील पहिली बहुशिक्षकी शाळा डिजिटल करण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बाजारपेठेचे मुख्य स्थान अशी सावळज (ता. तासगाव) गावची ओळख आहे. त्यासोबत आता गुणवत्ता आणि उपक्रमांची खाण असलेली जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, अशी नवीन ओळख तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रस्थापित झाली आहे. ब्रिटिश राजवटीत १८९२ मध्ये या शाळेची स्थापना झाली. शाळेच्या प्रवेशद्वारातूनच सुंदर ठोकळा फरशी आणि ज्ञानेश्वरांची मूर्ती लक्ष वेधून घेते. परिसर फुलाफळांच्या बागेने नटला आहे. या बागेत बहुतेकदा विद्यार्थी अभ्यास करताना दिसून येतात. निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांचा वाचनकट्टा बहरलेला दिसून येतो.
शिक्षकांचा ध्यास आणि विद्यार्थ्यांचा शिकायचा अट्टहास असे समीकरण जुळले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी गुणवत्तेत नेहमीच अव्वल असतो. या शाळेतील मुले टीटीएस, चौथी, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसह अन्य स्पर्धा परीक्षेतही अग्रेसर असतात. असे एकही शैक्षणिक वर्ष नाही, ज्यावर्षी येथील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले नाहीत. विशेष म्हणजे नवोदय विद्यालयासाठी निवड होऊनही काही विद्यार्थी जिल्हा परिषदेची शाळा सोडून गेले नाहीत, ही या शिक्षकांच्या कामाची पोहोच म्हणावी लागेल.
या शाळेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे अल्पावधितच शिक्षकांच्या धडपडीतून उभे करण्यात आलेले ई-लर्निंगच्या शिक्षणाचे जाळे. पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गात एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. ही शाळा ‘अ’ श्रेणीत आहे. पहिली ते सातवीपर्यंतची शाळा डिजिटल करण्यासह सर्व वर्गात ज्ञानरचनावादी शिक्षण पध्दतीचीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. दप्तराचे ओझे कमी करण्याचा आदर्शवत उपक्रमही सुरू केला आहे. शिक्षकांची पदरमोड, लोकप्रतिनिधींचा पुढाकार, दानशूर व्यक्ती आणि पालकांच्या मदतीने दोन लाख दहा हजार रुपये लोकवर्गणीतून खर्च करण्यात आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षात इंग्लिश ऱ्हाईम्स स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक आला आहे. वक्तृत्व, गायन, रांगोळी, क्रीडा, चित्रकला अशा विविध स्पर्धा, गीतमंच, शिक्षक व विद्यार्थ्यांचा पेटी-तबल्याचा वापर, रात्र अभ्यासिका अशा अनेक उपक्रमांत शाळेचा नावलौकिक आहे.
भौतिक सुविधांत ही शाळा परिपूर्ण असून, सुंदर बगीचा, आकर्षक रंगरंगोटी लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळेच या शाळेच्या पटसंख्येत भर पडत असून, विद्यार्थी घडवणारी शाळा, अशी ओळख निर्माण झाली आहे. गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, केंद्रप्रमुख प्रकाश कांबळे, विमल माने, केंद्रप्रमुख महादेव भोसले यांच्याकडूनही शिक्षकांना मार्गदर्शन होतेच. त्यामुळेच मुख्याध्यापक केदारी यादव आणि अण्णासाहेब गायकवाड, सुधीर माळवदे, प्रकाश सुतार, विकास पाटील, वनिता वायळ, प्रतिभा मुळे, शांता यादव, मीरा सुतार, रेखा अहिरे, रिनाजबी मुजावर, मंगल देशमुख या शिक्षकांनी कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
- दत्ता पाटील, तासगाव
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बाजारपेठेचे मुख्य स्थान अशी सावळज (ता. तासगाव) गावची ओळख आहे. त्यासोबत आता गुणवत्ता आणि उपक्रमांची खाण असलेली जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, अशी नवीन ओळख तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रस्थापित झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्येला गळती सुरू आहे, मराठी माध्यमांच्या शाळांतून पट टिकत नाही, अशी चर्चा होत असते. या चर्चा आणि समजुतीला सावळज येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकने छेद दिला आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या या बहुशिक्षकी शाळेत सद्य:स्थितीत साडेतीनशे विद्यार्थी आहेत. नावीन्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांकडून होणाऱ्या ज्ञानदानामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही ओढा कायम आहे. ही मोठ्या पटाची आणि बहुशिक्षकी शाळा डिजिटल करुन जिल्ह्यातील पहिली बहुशिक्षकी शाळा डिजिटल करण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. या शाळेमध्ये ई-लर्निंगच्या शिक्षणाचे जाळे. पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गात एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. दप्ताराचे ओझे कमी करण्याचाही उपक्रम आता सुरु करण्यात आला आहे. या शाळेला रम्य परिसर तर लाभला आहेच, शिवाय शाळेने जिल्ह्यामध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे.