सावळजच्या स्वाइन संशयित तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:33 AM2017-07-24T00:33:43+5:302017-07-24T00:33:43+5:30
सावळजच्या स्वाइन संशयित तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील गोरख रत्नाकर पोतदार (वय ३०) या स्वाइन फ्लू संशयित तरुणाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या चार दिवसांतील हा चौथा बळी आहे.
सावळज येथील गोरख पोतदार हे नातेवाइकांच्या विवाहासाठी नांदेडला गेले होते. ११ जुलैला नांदेडहून परतल्यानंतर त्यांना ताप व सर्दीचा त्रास सुरू झाला. सावळज येथील खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइनची लागण झाली असेल, असा संशय व्यक्त करून २० जुलैला त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या थुंकी व घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल अजून आलेला नाही, पण तरीही त्यांच्यावर स्वाइन फ्लू शक्यतेने उपचार सुरू होते. मात्र, रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
तासगाव तालुक्यात पहिल्यांदाच स्वाइन फ्लू संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रबोधनात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे.