महापालिकेच्या घंटागाडी डब्यात घोटाळा
By admin | Published: October 14, 2015 11:13 PM2015-10-14T23:13:51+5:302015-10-15T00:30:43+5:30
चौकशीचे आदेश : पाचशे डबे खरेदी करूनही प्रभाग वंचितच; १२ लाखांचा खर्च गेला कचऱ्यात!
सांगली : महापालिकेच्या घंटागाडीतील फायबर डब्यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. पालिकेने पाचशे डबे खरेदी केले होते. हे डबे मिरजेत वाटल्याचा दावा केला जात आहे, तर मिरजेचे नगरसेवक, डबेच मिळाले नसल्याची तक्रार करीत आहेत. सांगलीच्या वाट्याला डबेच आलेले नाहीत, मग पाचशे डबे गेले कुठे? असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. स्थायी समिती सभापती संतोष पाटील व आयुक्त अजिज कारचे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका क्षेत्रात कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अनेक कंटेनर कचऱ्याने भरून वाहत आहेत. पण वाहनेच नादुरुस्त असल्याने कचरा उठाव झालेला नाही. स्वच्छतेच्या कामाकडेही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यात आता घंटागाडीतील डब्यांची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. घंटागाडीतील डबे तुटल्याने कचऱ्याची वाहतूक करणे मुश्किलीचे झाले होते. कचरा गोळा केला तरी तो कंटेनरपर्यंत नेताना पुन्हा रस्त्यावर पडत होता. याची दखल घेत ८०० डबे खरेदीला मान्यता देण्यात आली. त्यासाठी सुमारे १२ लाख रुपयांंचा खर्च अपेक्षित होता. आरोग्य विभाग गेल्या काही महिन्यांपासून ५०० डबे खरेदी केल्याचे सांगत आहे. या डब्यांचे मिरजेत वाटप केल्याचा दावा केला आहे. मिरजेतील स्वच्छता निरीक्षक, मुकादमांनी थेट ठेकेदारांकडून डबे नेल्याचे समजते. पण मिरजेतील नगरसेवकांनी मात्र डबे मिळाले नसल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. मिरजेत डबे मिळाले नाहीत, तर गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगलीतील नगरसेवकांनी अनेकदा आयुक्तांची भेट घेऊन घंटागाड्यांसाठी डब्यांची मागणी केली. पण त्यांच्यापदरी नेहमीच निराशा आली आहे. आता उर्वरित तीनशे डबे खरेदी करून ते सांगली व कुपवाडला दिले जाणार असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. पण पाचशे डब्यांचे काय? याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. बुधवारी आयुक्त अजिज कारचे यांची काही नगरसेवकांनी भेट घेतली. तेव्हा डबेच गायब असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच स्थायी समितीच्या सभेतही हा विषय गाजला. आरोग्य विभागाने पाचशे डबे खरेदी केले असताना नव्याने ८०० डबे खरेदीचा नवा प्रस्ताव समोर आणला आहे.
त्यामुळे जुन्या खरेदीत घोटाळा झाल्याचे दिसून येते. त्यातून सारवासारव करण्यासाठी नवीन प्रस्ताव आणल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. सभापती संतोष पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश उपायुक्त सुनील पवार यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)
प्रकरण वादग्रस्त : आरोग्य अधिकाऱ्यांचे घूमजाव
स्थायी समितीत डबे खरेदीचा विषय गाजल्यानंतर नगरसेवकांनी आयुक्त कारचे यांची भेट घेतली. आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी आयुक्तांकडे डबे खरेदीची फाईल असल्याचा खुलासा केला होता; पण आयुक्त कार्यालयात ही फाईलच आलेली नव्हती. त्याबाबत आंबोळे यांना विचारता, त्यांनी घूमजाव करीत उपायुक्तांकडे फाईल आहे, असे उत्तर दिले. आयुक्तांनी तात्काळ ती फाईल घेऊन या, असा आदेश आंबोळेंना दिला. फाईल आणण्यासाठी आंबोळे आयुक्त कार्यालयातून बाहेर पडले, ते पुन्हा परतलेच नाहीत. आयुक्तांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते उपायुक्त कार्यालयाकडे न जाता थेट मुख्यालयातून बाहेर गेल्याचे दिसत होते. आयुक्तांनीही अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली.
रिक्षा घंटागाडीस दिली मान्यता
महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रिक्षा घंटागाडीचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी चार रिक्षा घंटागाड्या खरेदीस स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. विस्तारित भाग व उपनगरांतील कचरा जमा करण्यासाठी या घंटागाड्यांचा वापर केला जाणार असल्याचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले.