कारखान्यांसाठी नियमांच्या चिंधड्या

By admin | Published: August 10, 2016 11:40 PM2016-08-10T23:40:53+5:302016-08-11T00:54:41+5:30

वसंतदादा बँक घोटाळा : कारखाने, स्वकीयांच्या संस्थांना मुक्तहस्ते कर्जवाटप-

Scandal of the rules for the factories | कारखान्यांसाठी नियमांच्या चिंधड्या

कारखान्यांसाठी नियमांच्या चिंधड्या

Next

-वसंतदादा बँक  घोटाळा - १
अविनाश कोळी -- सांगली
राजकीय बगलबच्चे, नातलग तसेच व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्यासाठी बँकेतील कारभाऱ्यांनी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षात कर्जवाटपासाठी नियमांच्या चिंधड्या केल्याची बाब चौकशीतून पुढे आली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना दिलेल्या कर्जवाटपात सर्वाधिक नियम मोडण्यात आले.
बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने चार मोठ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलेले कर्ज सर्वात जास्त वादग्रस्त बनले आहे. या कर्जदार कारखान्यांमध्ये चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, कडेपूर येथील डोंगराई सागरेश्वर कारखाना, आटपाडीतील माणगंगा, जतमधील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. जरंडेश्वर कारखान्यास ८१ लाखाचे कर्ज विनातारण देण्यात आले होते. कारखान्याच्या हमीपत्रावर एवढी मोठी रक्कम देताना, सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. मुद्दल व व्याजासहीत आता या कारखान्याची थकबाकी २ कोटी ८१ लाखावर गेली आहे.
डोंगराई कारखान्यास वाहतूक, तोडणीसाठी ६ सप्टेंबर २00२ रोजी ४ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले. या कर्जासही योग्य तारण घेण्यात आले नाही. त्यामुळे सध्या कर्जाची थकबाकी २0 कोटी ९३ लाखांवर गेली आहे. माणगंगा कारखान्यास २५ फेब्रुवारी २00२ रोजी विनातारण ५ कोटी ४0 लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात आला होता. कारखान्याच्या हमीपत्रावर कर्जाला मुदतवाढही देण्याचा निर्णय झाला. आता या कारखान्याची थकबाकी २२ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपये झाली आहे. जतच्या डफळे कारखान्यास २८ आॅक्टोबर २00२ रोजी ३ कोटी ५0 लाख रुपये कर्ज देण्यात आले.
कारखाना थकबाकीत असतानाही कर्ज मंजूर करण्यात आले. तारण न घेता केवळ हमीपत्रावर कर्ज देण्यात आले होते. २९ डिसेंबर २00३ रोजी कारखान्याच्या विनंती अर्जावर कर्जाला मुदतवाढ देण्यात आली. आता ही थकबाकी १५ कोटी ७३ लाख ६९ हजारावर गेली आहे. या चारही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा होताना तारण मालमत्तेचा घोळ घालण्यात आला. काहींना विनातारण, तर काहींना योग्य तारण न घेता कर्ज देण्यात आले. त्यामुळे याच्या वसुलीत अनेक अडचणीत आल्या.


यांना धरले जबाबदार...
कारखान्यांच्या कर्ज प्रकरणात मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक सुरेश आवटी, किरण जगदाळे, शशिकांत कलगोंड पाटील, नरसगोंडा सातगोंडा पाटील, अमरनाथ सदाशिव पाटील, माधवराव ज्ञानदेव पाटील, तुकाराम रामचंद्र पाटील, प्रमिलादेवी प्रकाशराव माने, सुभाष गणपती कांबळे, निवृत्तीराव मारुती पाटील, सतीश आप्पासाहेब बिरनाळे (मृत), जंबुराव दादा थोटे (मृत), भरत महादेव पाटील, विजय विरुपाक्ष घेवारे, अधिकारी बी. डी. चव्हाण व बापूराव साठे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.


बँक आपली, नियम आपले आणि मर्जीसुद्धा आपली, अशा भूमिकेतून केवळ राजकीय, व्यक्तिगत हित साधण्यासाठी मुक्तहस्ते कर्जवाटप करण्यात आले. सहकारात स्वाहाकाराचा मंत्र जपताना याठिकाणच्या नेतृत्वाने दाखविलेली एकाधिकारशाही मोठ्या आर्थिक घोटाळ्याला कारणीभूत ठरली. वसंतदादांच्या नावे स्थापन झालेल्या या बँकेने अनेकांच्या आयुष्याला प्रगतीचे पंख देण्याचे काम केले. या पंखांच्या जोरावर गरुडभरारी घेणाऱ्या शेकडो कर्जदारांनी बँकेच्या आर्थिक शिस्तीच्या नरडीचा घोट घेतला. ज्याच्या जोरावर आपण मोठे झालो, ती संस्था टिकावी, अशा भावनेपेक्षा संस्था बुडावी आणि स्वत:चे आणखी भले व्हावे, असा हेतू बाळगणाऱ्यांनी ही संस्था रसातळाला पोहोचविली. आता याच संस्थेतील आर्थिक पापांचे मोजमाप चौकशीच्या माध्यमातून सुरू झाले आहे. या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारी मालिका वाचा आजपासून...

Web Title: Scandal of the rules for the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.