सांगलीतील गणेश मंडळांचे देखावे खुले
By admin | Published: September 6, 2016 11:06 PM2016-09-06T23:06:49+5:302016-09-06T23:43:58+5:30
नागरिकांची गर्दी : ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांवर भर; नव्या तंत्रज्ञानाचाही मूर्ती देखाव्यांसाठी वापर
सांगली : सांगली शहरात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी आपले देखावे खुले केले. यंदा सामाजिक, पौराणिक विषयांसह तांत्रिक देखाव्यांवरही मंडळांनी भर दिला आहे. अनेक मंडळांनी भव्य व आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून या मूर्तीबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई यासह सजीव देखाव्यांची परंपराही कायम राखली आहे.
सांगली शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंडळांनी महिनाभर आधीपासूनच देखाव्यांची तयारी सुरू केली होती. उत्सवाच्या पहिल्या दिवशीच देखावे खुले होतील, यासाठी प्रयत्न केले. यात काही मंडळांना यशही आले. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी बहुतांश मंडळांनी सायंकाळी देखावे खुले केले.
शिलंगण चौक मंडळाने ‘पावनखिंडची लढाई’ हा बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील देखावा उभारला आहे. कॉलेज कॉर्नरजवळील सावकार मंडळाने ‘शिवाजी महाराजांची आग्ऱ्याहून सुटका’ हा देखावा सादर केला आहे. शहीद भगतसिंह मंडळाने गणपतीपुळे येथील गणेश मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारली आहे.
वखारभागातील लक्ष्मी-नारायण गणेशोत्सव मंडळाने ‘संत तुकारामाचे वैकुंठगमन’ हा संत तुकारामांच्या जीवनातील एका घटनेवर आधारित देखावा उभारला आहे.
मोटारमालक संघ मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य-दिव्य देखावा उभारला आहे. लक्ष्मी-नारायण मंडळाने उभारलेला ‘द्रौपदी स्वयंवर’ हा पौराणिक देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कापडपेठ गणेशोत्सव मंडळाने नेहमीप्रमाणे यंदा पौराणिक देखाव्यावर भर दिला आहे. यंदा या मंडळाने ‘पतिव्रता सीता’ हा रामायणातील कथेवरील देखावा केला आहे. बसस्थानक परिसरातील रणझुंजार मंडळाने ‘रावणाला ब्रह्मदेवाचे वरदान’ या कथेवरील पौराणिक देखावा उभारला आहे. वखारभाग मंडळाने ‘लहान मुलांचे हरवलेले बालपण’ या विषयावर सामाजिक देखावा उभारला आहे. पटेल चौक मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्यदिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. या मंडळाने ‘लंकाधिपती रावणाचे गर्वहरण’ हा देखावा साने गुरुजी उद्यानात उभारला आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यांवर गर्दी : पोलिसांकडून नियोजन
शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले झाल्याने नागरिकांनी मंगळवारी सायंकाळनंतर रस्त्यांवर गर्दी केली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने शहर उजळले आहे. लहान-मोठी गणेश मंडळे भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले असून शहरातील चौका-चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.