इस्लामपूरच्या सखींनी अनुभवला चैतन्य व सौख्याचा सागर
By admin | Published: December 2, 2014 10:29 PM2014-12-02T22:29:50+5:302014-12-02T23:34:07+5:30
‘लोकमत’ सखी मंच : आनंद कृषी पर्यटन केंद्राची सहल
इस्लामपूर : स्त्रीसुलभ मनातील भाव-बंधनांचा कल्लोळ बाजूला सारत ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांनी बालपणीच्या आठवणींना कवेत घेत शिवारफेरी मारली. त्यासोबतच रेन डान्स, पोहणे, बोटिंग, झोपाळा, झुलता पूल, घोडेस्वारी, नेमबाजी, खो-खो, क्रिकेट अशा अनेकविध खेळांची डीजेच्या ठेक्यात आनंदात लयलूट केली. युवती, माता, आजी अशा वयाच्या भूमिकेत असणाऱ्या सखींनी आनंद कृषी पर्यटनातल्या या धमाल विरंगुळ्यातून मिळालेला आनंद मनाच्या कोंदणकुपीत साठवून ठेवत चैतन्य अन् सौख्याचा सागर अनुभवला.
‘लोकमत’ सखी मंचतर्फे सखी सदस्यांसाठी बोरगाव (सातारा) येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राची सहल काढण्यात आली. रविवारी सकाळी निघालेली ही सहल गाण्यांच्या भेंड्या, विनोद अशा धम्माल मौजमस्तीत आनंद केंद्रावर पोहोचली. तेथे गणेश दर्शन आणि चहा, नाश्ता घेऊन सखींच्या बालपणाचा आविष्कार सुरू झाला, तो तब्बल दिवसभर.
जगजितसिंह यांच्या गझलेतील ‘‘ए दौलत भी ले लो, ए शोहरत भी ले लो, भले छिन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारीश का पानी’’ या भावस्पर्शी ओळी सत्यात उतरवत सखी सदस्या डीजेच्या धमाक्यात रेन डान्समध्ये भिजल्या अन् थिरकल्याही. कागदी नावेप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या बोटीत विसावल्या. श्रावणातील झोपाळ्यावर झुलल्या. पाण्यात मनसोक्त पोहल्या. बालवयातील, तरुणपणातील सगळ्या आवेगाला पाण्यात झोकून देत पुन्हा ‘त्या’ चैतन्यदायी जीवनाची अनुभूती घेतली.
गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ‘सूर की नदीया हर दिशासे बहते सागर से मिले, बादलो का रूप लेके बरसे हलके, हलके.., ओ मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा...’ या काव्यपंक्तीचा आवेश घेत सखींनी आपल्या नानाविध वेशभूषा, रंगभूषा, करून विविधतेत एकता, असा जणू संदेशच दिला.
दमल्या-भागल्या सखी झाडाखाली विसावल्या, तर जोषात असणाऱ्या सखी खो-खो अन् क्रिकेट खेळल्या. काही सखी झोपाळ्यावरून घसरल्या आणि पुन्हा सावरल्याही. शिवारफेरी मारताना बैलाचा दोर हातात घेऊन फॉरेनच्या पाटलीणीसारख्या शिवारात फिरल्या. चिमणी-पाखरं, कबुतरे, खारुताईच्या विश्वात रमल्या.
जवळपास सात तासांच्या धम्माल मौज-मस्तीनंतर मनसोक्तपणे भोजनाचा आस्वाद घेतला. आईस्क्रिमचा सिप घेताना कॅरमवर स्ट्राईकरही धरला. आनंद कृषी पर्यटन केंद्रातील ही अविस्मरणीय मैफल पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली, ती ‘वो मासूम चहत की तस्वीर अपनी, वो ख्वाबो खिलौनौं की जागीर अपनी, न दुनिया का गम था न रिश्तों के बंधन, बडी खुबसूरत थी वो जिंदगानी’ अशा ओळी गुणगुणत सखींनी चिरतरुण मनाने ‘लोकमत’ परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आनंद कृषी पर्यटनचे संचालक आनंदराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सखींना मार्गदर्शन केले. जवळपास ९० सखी सदस्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)