शिष्यवृत्तीच्या पेपर तपासणीत गोलमाल
By admin | Published: May 8, 2016 12:46 AM2016-05-08T00:46:18+5:302016-05-08T00:46:18+5:30
कडेगावात पालकांची तक्रार : गुणवंत विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप
प्रताप महाडिक ल्ल कडेगाव
राज्य शासनाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केल्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली. या परीक्षेच्या पेपर तपासणीत गोलमाल झाल्यामुळे अनेक गुणवंत व प्रथम क्रमांकाचे दावेदार असलेले विद्यार्थीही गुणवत्ता यादीत आलेले नाहीत. याबाबतची तक्रारही संबंधित मुलांच्या पालकांनी कडेगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हास्तरावर झालेल्या या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी १८ विद्यार्थी कडेगाव तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची दावेदार म्हणून ज्या मुलीची चर्चा होती, त्या केतकी सतीश कुंभार या शिवणी शाळेच्या विद्यार्थिनीला मराठीत १०० पैकी ९८, गणित १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत. परंतु बुद्धिमत्ता चाचणीत १०० पैकी ३६ गुण मिळाले आहेत. बुद्धिमत्ता चाचणीतही १०० पैकी १०० गुण मिळतील, असा केतकीला आत्मविश्वास आहे. यापूर्वी तिसरीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता.
कडेगाव शाळेची विद्यार्थिनी सई प्रदीप महाडिक हिनेही तिसरीच्या गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला होता. तिला आता या परीक्षेत मराठीत ९८ गुण मिळाले आहेत. परंतु गणितात ६६, तर बुद्धिमत्ता चाचणीत ६० गुण मिळाले आहेत. तिला गणित विषयात ९८, तर बुद्धिमत्ता चाचणीत १०० गुण मिळतील, असे नमुना उत्तरपत्रिकावरून स्पष्ट होत आहे.
केतकी व सईप्रमाणेच विश्वजित शिवनंदन पवार या कडेगावच्या विद्यार्थ्याच्या गुणातही गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय तालुक्यातील अनेक मुलांच्या तसेच पालकांच्या तक्रारी कडेगावचे गटशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांच्याकडे आल्या आहेत. याबाबत उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठीचे प्रस्ताव तसेच पालकांचे तक्रार अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत, असे उकिर्डे यांनी सांगितले.
पालकांच्या तक्रारींची दखल घेऊ - नीशादेवी वाघमोडे
४ही परीक्षा फक्त सांगली जिल्हास्तरावर घेतली होती. निकालावरून काही पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. उत्तरपत्रिका संगणकाच्या साहाय्याने (ओएमआर) पद्धतीने तपसल्या आहेत. तरीही पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित मुलांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करणार आहे, असे शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.
४शिक्षण विभागाने घेतलेल्या परीक्षेच्या निकालावरून तक्रारी वाढत आहेत. तक्रार आलेल्या मुलांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी. यामध्ये कोणी अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे जिल्हा परिषदेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी सांगितले.