ऐनवाडी येथे शाळा आपल्या दारी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:48+5:302021-07-08T04:18:48+5:30
विटा : कोरोनाच्या महामारीमुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शिक्षणाला मोठी खीळ बसली आहे. ...
विटा : कोरोनाच्या महामारीमुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शिक्षणाला मोठी खीळ बसली आहे. अशा परिस्थितीत ऐनवाडी (ता.खानापूर) येथील अगस्ती विद्यालयाने नवी संकल्पना सुरू केली आहे. या विद्यालयाने ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला असून, सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरा-घरात पोहोचून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
खानापूर पूर्व भागातील ऐनवाडी येथील अगस्ती विद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत आहे. मुख्याध्यापक संतोष नाईक यांच्या प्रयत्नातून या विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तावाढीसह अन्य उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. सामाजिक अंतर ठेवून व कोविडच्या सर्व नियमांचे पालन करीत काही दिवस शाळा सुरू झाल्या; परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रम शिकवता आला नाही.
त्यासाठी शासनाने १ जुलै ते १५ ऑगस्ट या ४५ दिवसांत मुलांच्या शैक्षणिक क्षमतावाढीसाठी मागील इयत्तेच्या उजळणीसाठी सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) सुरू केला आहे. मागील इयत्तेमधील अभ्यासक्रमावर आधारित हा कृती कार्यक्रम असून, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष नाईक व सर्व शिक्षकांनी ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाव्दारे अगस्ती विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन ऑनलाइन तासिकांचा आढावा घेणे, स्वाध्याय, शुद्धलेखन तपासणे, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून अडी-अडचणी समजून घेणे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
खानापूर पूर्व भागातील ऐनवाडीच्या अगस्ती विद्यालयाचा ‘शाळा आपल्या दारी’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालकांतून स्वागत होत आहे.
फोटो : ०७०७२०२१-विटा-अगस्ती स्कूल
ओळ : ऐनवाडी येथील अगस्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष नाईक यांच्या संकल्पनेतून शाळा आपल्या दारी, या उपक्रमाची सुरुवात झाली असून, प्रत्यक्षात घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे.