चिंचणीमध्ये भरली विठ्ठलनामाची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:04 PM2019-07-13T19:04:02+5:302019-07-13T19:07:26+5:30
शाळकरी वारकरी... समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात बालके... असे भक्तिमय वातावरण होते. निमित्त होते आषाढी एकादशीचे..
प्रताप महाडिक
कडेगाव : हातात भगवा ध्वज... मुखात विठू नामाचा जयघोष... जोडीला टाळ-मृदंग... भजन करीत चाललेले शाळकरी वारकरी... समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात बालके... असे भक्तिमय वातावरण होते. निमित्त होते आषाढी एकादशीचे , चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली आणि दिंडीमधून जनजागृती तर केलीच पण यावेळी गावातील शिवाजी चौकात अभुतपुर्व रिंगणसोहळा संपन्न झाला .या सोहळ्यातील नेत्रदीपक अश्वदौड तसेच बाल वारकऱ्यांच्या वेशभूषानी गावकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यामुळे येथे अक्षरशः विठ्ठल नामाची शाळा भरली होती .
टाळ मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करीत विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली . या वेळी विठ्ठल-रुक्मिणी, सोपान, निवृत्ती, ज्ञानेश्वर, अशा वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते.शिवाजी हायस्कूलच्या मैदानात प्रारंभी रिंगण सोहळा संपन्न झाला आणि दिंडी निघाली.माऊली माऊली नामाच्या जयघोषात मुख्याध्यापक व्ही एस बारामते यांचेसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी लिलया पालखी खांद्यावर घेतली आणि गावातील प्रमुख रस्त्याने दिंडी काढण्यात आली.
दिंडीनंतर गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी मैदानावर पांडुरंगासह विविध संतांभोवती बाल वारकऱ्यांनी रिंगण केले.यावेळी टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म यामुळे माऊली व विठ्ठल नामाने आसमंत व्यापून गेल्याची प्रचिती येत होती.
नेत्रदीपक अश्वदौड:
विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी व माउलींच्या पालखी सोहळ्यावेळी आकाशात ढगांनी गर्दी केली होती. कधी पाऊस कोसळत होता .याच उत्साहाच्या वातावरणात दिंडीच्या ध्वजासह विद्यार्थ्यांनी रिंगणाला २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि अश्व दौड सुरू झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थी व गावकऱ्यांनी माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करून हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवित सोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी अश्वदौड नेत्रदीपक झाली पण अश्वाला आवरताना सेवकांची मात्र दमछाक झाली.दरम्यान मुलींचा फुगडीचा खेळही रंगला होता .