डफळापूर गटातील शाळा इमारती धोकादायक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:00 PM2019-11-05T12:00:35+5:302019-11-05T12:01:20+5:30
डफळापूर जिल्हा परिषद गटात प्राथमिक शाळांच्या इमारतींकडे सांगली जिल्हा परिषदेकडून पूर्णत: दुर्लक्ष आहे. शाळेने वेळोवेळी दिलेले धोकादायक शाळा खोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून धुडकावून लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे येथील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
डफळापूर : डफळापूर जिल्हा परिषद गटात प्राथमिक शाळांच्या इमारतींकडे सांगली जिल्हा परिषदेकडून पूर्णत: दुर्लक्ष आहे. शाळेने वेळोवेळी दिलेले धोकादायक शाळा खोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून धुडकावून लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे येथील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
जिरग्याळ, डफळापूर शाळा नं. १ व नाईक वस्ती शाळा येथे धोकादायक शाळा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांसाठी जागा अपुरी आहे. त्याच शाळांमध्ये धोकादायक इमारती अखेरच्या घटका मोजत आहेत.
विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत वावरावे लागत आहे. जिरग्याळ येथे शाळेच्या आवारात चार खोल्यांची पडझड झाली आहे. डफळापूर गावात शाळा नं १ ची जागा अपुरी आहे. शाळेत धोकादायक इमारत आहे. या इमारतीच्या छताचा गिलावा पडत आहे.
यात विद्यार्थ्यांना बसवले जात नाही, परंतु जागाच अपुरी असल्याने मुलांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. शाळा खोल्यांचे बांधकाम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले गेल्याने बांधकाम चांगले न झाल्याने या इमारती धोकादायक बनल्या असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित शाळा व व्यवस्थापन समितीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग येणार का? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. धोकादायक इमारती शाळेच्या आवारातून त्वरित हटवून नवीन खोल्यांचे बांधकाम करावे, अशी पालकांची मागणी होत आहे.