Sangli: सर्पदंशाने शाळकरी मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:57 AM2023-10-09T11:57:47+5:302023-10-09T11:59:16+5:30
अचानक जागी होऊन 'ती' ओरडू लागली, कुटुंबीयांनी पाहिले तर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले; रुग्णालयात नेले पण..
संख : संख (ता.जत) येथील न्हावी वस्तीत राहत असलेल्या श्रेया श्रीशैल न्हावी (वय १५) या शाळकरी मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला. नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. श्रेयाच्या निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी, श्रेया ही संख येथील आर. बी. पी. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. काल रात्री ती नेहमीप्रमाणे लवकरच झोपी गेली. गावात वीजपुरवठा खंडित होता. रात्री आठच्या सुमारास तिला सर्पदंश झाला. ती जागी होऊन ओरडू लागली. कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आणले. खासगी रुग्णालयात तत्काळ नेले. तेथून तिला रात्री दहाच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. न्हावी वस्तीवर आक्रोश करण्यात आला. तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. जत पूर्व भागात पावसाळ्यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.