शाळांचे पालकत्व अधिकाऱ्यांकडे..!
By admin | Published: August 29, 2016 10:45 PM2016-08-29T22:45:16+5:302016-08-29T23:18:26+5:30
आयुक्तांचा नवा उपक्रम : खातेप्रमुखांना दिल्या महापालिकेच्या शाळा दत्तक
सांगली : महापालिका शाळांचा घसरलेला दर्जा सुधारण्यासाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पाऊल उचलले आहे. पालिकेच्या खातेप्रमुखांवर आता शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन दर्जात्मक बदल घडविण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.
सध्या महापालिका शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. दरवर्षी शाळेची पटसंख्या राखतानाच अधिकाऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यात शाळेत सुविधांचा दुष्काळ आहे. आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यात गोरगरिबांची मुले या शाळेत शिकत असल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. यावर आता आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीच उपाय शोधला आहे.
पालिकेच्या सर्व खातेप्रमुखांना एक शाळा दत्तक दिली जाणार आहे. या शाळांची सर्वस्वी जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. पहिल्या टप्प्यात पालिकेच्या २० शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक तास अथवा महिन्यातून दोनदा भेट द्यायची आहे. महिन्यातील एक दिवस या अधिकाऱ्याने शाळेत घालवायचा आहे. शाळेतील समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारीही त्याच्यावर असेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, शाळेचे प्रश्न सुटावेत, शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवावेत, शैक्षणिक सहलीचे आयोजन करावे, मुलांचा वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागृती करावी, अशी विविध उद्दिष्ट्ये त्यांना देण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांना पालकांशीही संवाद साधून शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजीही अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे. शाळेचे नूतनीकरण व इतर खर्चाबाबतही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेच्या पैशाऐवजी स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उद्योजकांचे सहकार्य घेऊन शाळेत बदल घडवून आणाला जाणार आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन त्याचेही सहकार्य घ्यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
आयुक्त मैदानात
महापालिकेच्या शाळांमधील दुर्दशा संपविण्यासाठी खुद्द आयुक्त खेबूडकरही मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्वत: शाळा नंबर ४२ दत्तक घेतली आहे. त्यांच्यासह उपायुक्त सुनील पवार, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, शहर अभियंता रवींद्र कांडगावे, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, मुख्य लेखापाल सुहासिनी पाटील अशा सर्वच अधिकाऱ्यांकडे त्यांनी शाळांची जबाबदारी सोपविली आहे.