तब्बल दोन वर्षानंतर मैदाने पुन्हा गजबजणार, शालेय क्रीडा स्पर्धा सुरु होणार
By संतोष भिसे | Published: September 20, 2022 05:55 PM2022-09-20T17:55:01+5:302022-09-20T18:13:32+5:30
सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती.
सांगली : गेली दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरु करण्यास शासनाने हिरवा कंदील दर्शविला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यतेचे परिपत्रक जारी केले.
क्रीडा व युवक सेवा विभागाच्या आयुक्तांनी मान्यतेसाठी शासनाला विनंतीपत्र दिले होते. त्याला शासनाने मान्यता दिली. कोरोना व लॉकडाऊन काळात सर्व सार्वजनिक क्रीडा स्पर्धा बंद होत्या. शालेय क्रीडा स्पर्धांनाही त्याचा फटका बसला होता. आता कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. सण-समारंभ, उत्सव दहीहंडी आणि गणेशोत्सव धडाक्यात व निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांचा निर्णय मात्र होत नव्हता. यामुळे खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांमध्ये नाराजी होती.
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमधून अनेक खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत झेप घेतात. परीक्षेतील गुण वाढण्यातही त्याचा फायदा होतो. त्यामुळे स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर त्याला मंजुरी मिळाली. दरम्यान, अर्धे शैक्षणिक सत्र संपत आल्यावर मंजुरी मिळाल्याने क्रीडा स्पर्धा कधी घ्यायच्या असा प्रश्न शिक्षण विभागापुढे आहे.