शाळा, महाविद्यालयात ‘रॅगिंग’मुळे होतेय घुसमट!

By admin | Published: December 9, 2014 11:50 PM2014-12-09T23:50:40+5:302014-12-09T23:51:20+5:30

तक्रारींचा अभाव : समित्या, विद्यार्थ्यांचे प्रतिज्ञापत्र कागदावरच; ठोस यंत्रणेअभावी अडचणी

Schools and colleges are ragging due to the intrusion! | शाळा, महाविद्यालयात ‘रॅगिंग’मुळे होतेय घुसमट!

शाळा, महाविद्यालयात ‘रॅगिंग’मुळे होतेय घुसमट!

Next

सचिन लाड- सांगली -जिल्ह्यात महाविद्यालयातील तरुणांनी ‘रॅगिंग’च्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. काही घटना उघड होतात, तर काही होत नाहीत. महाविद्यालयात उघड होणारे हे प्रकार आता शाळांमध्येही सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती तशीच दाबून ठेवून ते आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे चित्र आहे. ‘रॅगिंग’बाबत विद्यार्थी तक्रार करण्यास पुढे येताना दिसत नाहीत. यामुळे महाविद्यालयात रॅगिंगविरोधी कृती समित्या व विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलेले प्रतिज्ञापत्र कागदावरच रहात आहे.
गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील सचिन लालासाहेब जावीर (वय १५) हा पलूस येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयात दहावीत शिकत होता. गेल्या आठवड्यात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विद्यालयातील ११ वी व १२ वीचे विद्यार्थी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचे अकरावी व बारावीतील विद्यार्थी भयानक पद्धतीने ‘रॅगिंग’ करीत असल्याचे लेखी पत्र लिहून त्याने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. या घटनेवरून महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संशयित निर्दोष...
आतापर्यंत सांगली, बुधगाव, पलूस याठिकाणी विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सांगलीत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याप्रकरणी रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटलाही चालविण्यात आला होता; मात्र पोलिसांकडून फारसे पुरावे उपलब्ध न झाल्याने संशयित विद्यार्थ्यांची निर्दोष मुक्तता झाली.


‘मी रॅगिंग करणार नाही’
प्रवेश देताना शाळा व्यवस्थापन ‘मी रॅगिंग करणार नाही’, असे विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेते. रॅगिंग होत असेल तर, विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी महाविद्यालयात रॅगिंगविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु या समितीचे कार्य काय आहे, याचा समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही विसर पडला आहे. पदाधिकारी कधीही विद्यार्थ्यांची एकांतपणे भेट घेत नाहीत. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत. यामुळे विद्यार्थी तणावात आहे का नाही? याची त्यांना माहिती मिळत नाही.


पलूसमध्ये घडलेली घटना गंभीर आहे़ रॅगिंग ंंंंरोखण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी जागृती करणे आवश्यक आहे़ पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे़ रॅगिंग होऊच नये यासाठी सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे़
- शाहीर पाटील, मुख्याध्यापक, सर्वोदय हायस्कूल, सांगली

महाविद्यालयात प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून ‘मी रॅगिंग करणार नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. पण पुढे काय? शेकडो प्रतित्रापत्रे धूळ खात पडतात. शिक्षक व पालकांचा विद्यार्थ्यांशी संवाद कमी होत चालला असल्याचे पलूसमधील घटनेवरून स्पष्ट होते.
- सचिन सव्वाखंडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी संसद
रॅगिंग होत असेल तर, त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण होते. ही भीती ते तशीच दाबून ठेवतात. त्याचे रूपांतर मानसिक तणावात होऊन मग ते आत्महत्या करतात. खरं तर या प्रसंगाला विद्यार्थ्यांनी धाडसाने तोंड दिले पाहिजे. यासाठी महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्तन गुन्हेगारासारखे असते. त्यांच्या या वर्तनात बदल घडविण्यासाठी महाविद्यालयात तज्ज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती केली पाहिजे.
- डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञ, सांगली.

Web Title: Schools and colleges are ragging due to the intrusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.