corona virus : जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 06:40 PM2022-01-22T18:40:04+5:302022-01-22T18:40:44+5:30
दरम्यान सर्व शाळांचे ऑनलाईन तास मात्र चालू ठेवण्यात येणार आहेत.
सांगली : राज्य शासनाने सोमवार दि. २४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा दि. ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्य शासनाने दि. २० जानेवारी २०२२ रोजी आदेश काढून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू ठेवणे आणि बंद करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. जिल्ह्यातील दि. २१ जानेवारी २०२२ रोजी संपणाऱ्या आठवड्याचा कोविड-१९ च्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन तपासणीचा पॉझिटिव्हिटी दर २३.९९ टक्के इतका आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत व कोविड पॉझिटिव्हिटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. चौधरी यांनी जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा दि. ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शाळांचे ऑनलाईन तास मात्र चालू ठेवण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, महापालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने अंमलबजावणी केली पाहिजे.