दहावीच्या मूल्यांकनात शाळांनी घातलाय घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:22+5:302021-07-14T04:30:22+5:30
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीच्या परीक्षेत कोरोनाने अडथळे आणले, पण त्यामध्ये शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. मूल्यांकन करताना ...
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावीच्या परीक्षेत कोरोनाने अडथळे आणले, पण त्यामध्ये शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. मूल्यांकन करताना त्यामध्ये बरेच घोळ घातले असून ते निस्तरण्यासाठी परीक्षा मंडळाला शिबिरे घ्यावी लागली आहेत. यामुळे निकालाला विलंब होण्याची शक्यता आहे.
कोरोनाने यावर्षी जणू शिक्षण क्षेत्राचीच परीक्षा घेतली. त्यातून मार्ग काढताना शासनाने दहावीची परीक्षा रद्द करुन मूल्यांकनाचा निर्णय घेतला. त्यासाठी मार्गदर्शिकाही जाहीर केल्या. त्यांचे पालन करताना शाळांनी बरेच घोळ घालून ठेवले आहेत. कोल्हापूर विभागाच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शाळांनी मूल्यांकन ऑनलाईन स्वरुपात बोर्डाकडे पाठवले आहे. त्याच्या नोंदी संगणक प्रणालीमध्ये केल्या. शाळांनी पाठवलेल्या निकालात बरेच तांत्रिक दोष आढळले आहेत. त्यांच्या दुुरुस्तीसाठी बोर्डाला शिबिरे घ्यावी लागली.
बॉक्स
- मूल्यांकन संगणक प्रणालीमध्ये नोंदवताना तांत्रिक त्रुटी राहिल्या, चुका झाल्या. विद्यार्थ्यांची नावे सदोष आहेत. गुण कमी-जास्त नोंदवले आहेत.
- एका विषयाचे गुण दुसऱ्यासाठी दिलेत, २० आणि ३० टक्के गुणांकनामध्येही सरमिसळ केली आहे. काही शाळांनी मूल्यांकनाचा पॅटर्न वेळेत न समजल्याने गडबड घोटाळे केलेत.
- रिपिटर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकातही त्रुटी आहेत. या साऱ्या चुका निस्तरण्यासाठी बोर्डाने सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्हानिहाय शिबिरे घेतली.
बॉक्स
सर्व शाळांनी मूल्यांकन पाठवले
जिल्ह्यातील सर्व म्हणजे ५५० शाळांनी मूल्यांकन बोर्डाकडे पाठवले, पण मुदतीत काम करण्याच्या धांदलीत तांत्रिक चुका केल्या. काही शाळांनी ऐनवेळेस माहिती अपलोड केली, त्यामुळेही त्रुटी काढायला त्यांना वेळ मिळाला नाही.
कोट
शंभर टक्के निर्दोष मूल्यांकन
बोर्डाने दिलेल्या मुदतीमध्ये दहावीचा निकाल संगणकीय प्रणालीतून अपलोड केला. मूल्यांकन निश्चितीसाठी पुरेसा वेळ मिळाला, त्यामुळे चुका टाळता आल्या. १०० टक्के निर्दोष निकाल तयार करता आला. मूल्यांकनामध्ये दोष असल्याविषयी बोर्डाकडून कोणत्याही सूचना नाहीत.
- शंकर स्वामी, मुख्याध्यापक, बी. एस. पाटील विद्यालय, सलगरे
दहावीची निकाल निश्चिती करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पॅटर्ननुसार मूल्यांकन केले. नववी व दहावीचे गुण गृहित धरुन गुणपत्रिका तयार केल्या. बोर्डाने दिलेल्या वेळेत संगणकीय प्रणालीवर अपलोड केल्या. त्यामध्ये त्रुटी असल्याविषयी कोणत्याही सूचना बोर्डाकडून आलेल्या नाहीत.
- राजेंद्र नागरगोजे, मुख्याध्यापक, मिरज हायस्कूल.
शाळांकडून ऑनलाईन मूल्यांकन मिळाले आहे. त्यात काही प्रमाणात त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी जिल्हानिहाय शिबिरे घेतली आहेत. त्रुटी काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाला सादर केली जाणार आहे.
- देवीदास कुलाळ, विभागीय सचिव, परीक्षा मंडळ, कोल्हापूर
पॉईंटर्स
जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी ४१,०७६
एकूण मुले २२,७६६
एकूण मुली १८,३१०
जिल्ह्यातील शाळा ७१७
मूल्यांकन झाले ७१७
मूल्यांकन बाकी ०००