सांगलीत उद्यापासून शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा
By Admin | Published: January 8, 2015 11:23 PM2015-01-08T23:23:01+5:302015-01-09T00:25:46+5:30
युवराज नाईक : जिल्ह्याला दुसऱ्यांदा बहुमान
सांगली : सांगलीकरांना उद्यापासून मल्लखांब खेळाच्या चित्तथरारक कसरती पाहावयास मिळणार आहेत. तरुण भारत स्टेडियममध्ये ६० व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक व बापू समलेवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सांगली जिल्हा अॅमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व तरुण भारत व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० व ११ जानेवारी रोजी तरुण भारत स्टेडियममध्ये या स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी भव्य व्यासपीठ, दोन पुरलेले मल्लखांब व एक दोरीवरील मल्लखांबाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी तीन प्रशस्त गॅलऱ्या उभारण्यात आल्या आहेत.
आज जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्पर्धास्थळाची पाहणी केली. यावेळी आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक बापू समलेवाले, तरुण भारत मंडळाचे सचिव महेश पाटील, सुधाकर जमादार, दीपक सावंत, सुरेश लांडगे उपस्थित होते.
स्पर्धेत १६ राज्यांतील २५० पेक्षा अधिक नामवंत खेळाडू सहभागी होतील. खेळाडू व प्रशिक्षकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सिंगापूरच्या खेळाडंूची प्रात्यक्षिके सांगलीकरांना पाहावयास मिळतील. जिल्ह्यावर विविध खेळांच्या राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची बरसात होत आहे. जिल्ह्यास शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा आयोजनाचा बहुमान दुसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी मिरजेच्या भानू तालमीत या स्पर्धा पार पडल्या होत्या. (प्रतिनिधी)