विजयाचे शिल्पकार यंगस्टारच..निवडणुकीच्यादृष्टीने रोहितची मशागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 03:46 PM2019-10-26T15:46:00+5:302019-10-26T15:47:28+5:30
हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती.
अशोक डोंबाळे ।
सांगली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजेत्यांच्या विजयाचे शिल्पकार तरुण चेहरे आहेत. वाळवा, तासगाव, खानापूर, मिरज, सांगली विधानसभा मतदार संघात आमदारांच्या मुलांनी निर्णायक प्रचार यंत्रणा हलविली आहे. हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक झाली. त्यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक एकतर्फीच होती. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती. आबांचे चिरंजीव रोहित यांनी निवडणुकीच्या आधी सहा महिने मतदारसंघ पिंजून काढला होता. निवडणुकीत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विनम्रता आणि उत्कृष्ट भाषण कौशल्यावर त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासारखा तगडा उमेदवार असतानाही सुमनतार्इंना विक्रमी मतदानाने विजय मिळवून दिला. रोहितने काँग्रेसचे जतचे उमेदवार विक्रम सावंत यांच्या मतदार संघातही सभा घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने रोहितची मशागत झाली आहे.
इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विजयाचे शिल्पकारही युवकच ठरले. त्यांचे चिरंजीव प्रतीक व राजवर्धन पाटील यांनी प्रचार यंत्रणा राबविण्यापासून ते काही गावांतील गटा-गटांमध्ये मनोमीलन करुन त्यांना एकसंध करण्यात योगदान दिले. प्रत्येक गावापर्यंत ते पोहोचले होते. शेजारच्या शिराळा मतदार संघातील प्रचार यंत्रणेवरही त्यांनी लक्ष ठेवले होते. त्यांच्या बारकाव्यांमुळेच जयंत पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक यांचा विजय सोपा झाला. मानसिंगराव यांचे पुत्र विराज यांनीही प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती.
खानापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना चौथ्यावेळी आमदार करण्यात त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर व विट्याचे नगरसेवक अमोल बाबर यांचा मोठा वाटा आहे. खानापूर, आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव तालुक्यातील २१ गावे खानापूर मतदार संघात येतात. मोठे क्षेत्र असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणेच त्यांच्यादृष्टीने मोठे आव्हान होते. तरीही दोन मुलांमुळेच बाबर यांना प्रचार यंत्रणा राबविण्यात फारशी अडचण आली नाही. आगामी निवडणुकीत चेहरा बदलण्याचीच वेळ आली, तर या दोघांचा पर्याय निर्माण झाला आहे.
जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या विजयातही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेले त्यांचे पुत्र धैर्यशील व पुतणे यश यांचा मोठा वाटा आहे. भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र प्रशांत यांनी सांभाळली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या या विजयात त्यांचे पुत्र सिध्दार्थ गाडगीळ यांचा वाटा आहे. व्यापारी वर्गासह सुशिक्षित घटकांना भाजपकडे खेचण्यात यश मिळविले.
पलूस-कडेगावचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा विक्रमी मताने विजय खेचून आणण्यात बंधू शांताराम कदम, पुतणे जितेश कदम आणि भाचे ऋषिकेश लाड यांचा वाटा आहे. विश्वजित कदम राज्यभर प्रचार दौऱ्यावर असताना मतदार संघातील प्रचाराची धुरा तरूण चेहऱ्यांनीच सांभाळली.