जिल्हा परिषदेच्या दोन मतदार संघांना कात्री
By admin | Published: August 23, 2016 11:57 PM2016-08-23T23:57:32+5:302016-08-24T00:31:15+5:30
मतदारसंघ निश्चित : वाळवा, मिरज तालुक्यांना दिलासा; सर्वात कमी सदस्यसंख्या खानापूर तालुक्यात
सांगली : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांची मतदारसंघ संख्या निश्चित केली आहे. नवीन रचनेनुसार जिल्हा परिषदेचे ६२ ऐवजी ६० गट आणि पंचायत समित्यांचे १२४ ऐवजी १२० गण झाले आहेत. वाळवा, मिरज तालुक्यांमध्ये एक गट आणि दोन गणांची संख्या वाढली आहे. कवठेमहांकाळ, शिराळा, खानापूर, पलूस येथे नगरपरिषद, नगरपंचायती झाल्यामुळे धक्का बसला असून, प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी झाले आहेत. सर्वात कमी सदस्यसंख्या खानापूर तालुक्यात राहील.
निवडणूक आयोगाने मतदारसंघ निश्चित करण्यासाठी २०११ च्या लोकसंख्येचा विचार केला आहे. लोकसंख्येनुसार काही तालुक्यात मतदारसंघांची संख्या वाढली, तर काही तालुक्यात कमी झाली आहे. जिल्ह्यात कडेगाव, पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ आणि खानापूर येथे नव्याने नगरपरिषद, नगरपंचायती झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समित्यांमध्ये मतदारसंघांची संख्या नव्याने निश्चित केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे मतदारसंघच गायब झाले आहेत. खानापूर तालुक्यामध्ये पूर्वी जिल्हा परिषदेची चार आणि पंचायत समितीची आठ सदस्यसंख्या होती. नवीन रचनेमध्ये खानापूर जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समित्यांचे गण रद्द झाले आहेत. खानापूर गाव वगळून अन्य गावे जवळच्या मतदारसंघात समाविष्ट होणार आहेत. खानापूर तालुक्यात जि. प. गट तीन आणि पंचायत समित्यांचे गण सहा राहणार आहेत. सर्वात कमी सदस्यसंख्या असणारा हा तालुका आहे. पलूस तालुक्यामधील पलूस जिल्हा परिषद गटासह चार पंचायत समितीचे गण कमी झाले असून येथे आता चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण असतील. कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यातीलही प्रत्येकी जिल्हा परिषदेचा एक गट आणि दोन पंचायत समिती गणांची संख्या कमी झाली आहे.
मिरज आणि वाळवा तालुक्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे जिल्हा परिषद एक गट आणि दोन गणांची संख्या वाढली आहे. यामुळे येथील इच्छुकांना जादा मतदारसंघांची संधी उपलब्ध होणार आहे. कडेगाव, जत, आटपाडी, तासगाव तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच जैसे थे राहणार आहे. नविन मतदारसंघ संख्या निश्चितीमध्ये अनेकांचे गट आणि गण रद्द झाल्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. (प्रतिनिधी)
आरक्षणाचा बदल
खानापूर, कडेगाव, तासगाव या पंचायत समित्यांमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे यावेळी अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता प्रत्येकी एक जागा आरक्षित होत आहे. मागील निवडणुकीत या जागा अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. त्यामुळे आता या जागा अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहेत.
आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, शिराळा येथील चार पंचायत समित्यांमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता प्रत्येकी एक जागा आरक्षित होत असून, मागील निवडणुकीमध्ये ही जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित होती. त्यामुळे आता ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणार आहे.
आरक्षित सदस्य
जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ६० असून त्यापैकी ३० मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण गटासाठी ३७ सदस्य असून यापैकी महिलांसाठी १८ मतदारसंघ आरक्षित राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी सात मतदारसंघ आरक्षित असणार असून चार महिलांसाठी, तर मागास प्रवर्गसाठी १६ मतदार संघ आरक्षित असून आठ महिलांसाठी आरक्षित आहेत.