सांगलीतील पेट्रोलपंप जिल्हाधिकाºयांकडून सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:57 AM2017-09-27T00:57:56+5:302017-09-27T00:57:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या बायपास रस्त्यावरील मातोश्री पेट्रोलपंपावर मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईने पंपावरील कर्मचाºयांत धावपळ उडाली. महसूल अधिकाºयांसह पोलिसांच्या मदतीने या पेट्रोलपंपाची तपासणी करण्यात आली. यात भेसळ, तेलसाठ्याची रजिस्टरला नोंद नसल्याचे आढळून आले असून, घनतेमध्ये फरकाचा ठपका ठेवत हा पंप सील करण्यात आला. जिल्हाधिकाºयांनी पेट्रोलपंपावर छापा टाकण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
तब्बल पाच ते सहा तास या पेट्रोलपंपाची तपासणी सुरू होती. अखेर पंप सील करून पंपचालकावर जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्याखाली कारवाई करण्यात येणार असून, जिल्हा पुरवठा विभागाकडून फिर्याद दाखल केली जाईल, असे जिल्हाधिकारी काळम-पाटील
यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांत खळबळ उडाली आहे. बायपास रस्त्यावर महेंद्र भालेराव (रा. जळगाव) यांचा मातोश्री पेट्रोलपंप आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी हा पंप चालविण्यासाठी घेतला आहे. या पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेतली. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हाधिकारी काळम-पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी पंपावर दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला तक्रार असलेला हाच पंप आहे का, याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वैधमापन निरीक्षक आर. पी. काळकुटे, भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक जे. एस. जोसेफ कर्मचाºयांसह पंपावर दाखल झाले. त्यांनी पंपाची तपासणी सुरू केली.
जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, शहरचे निरीक्षक राजेंद्र शेळके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने, ग्रामीणचे निरीक्षक रवींद्र डोंगरे, उपप्रादेशिक अधिकारी दशरथ वाघुले, वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम हेही फौजफाट्यासह पंपावर आले. पेट्रोल व डिझेलचे दोन्ही पंप उघडून त्याची तपासणी करण्यात आली. पंपातून पेट्रोल एका मापात घेऊन त्याची पडताळणी केली. पंपाच्या यंत्रामधील सील तोडण्यात आल्याचे दिसून आले. पेट्रोल टाकीजवळ लांबपर्यंत काळे डाग पडले होते. त्यावरून तेलामध्ये भेसळ करण्यात आल्याचा संशय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाºयांनी व्यक्त केला. त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच पेट्रोल टाकीतील साठ्याची पडताळणी करण्यात आली.
पाच ते सहा तास वरिष्ठ अधिकाºयांकडून पंपाची तपासणी करण्यात येत होती. स्वत: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दोघेही अधिकारी व कर्मचाºयांना सूचना देत होते. जिल्हाधिकाºयांनी इतर पेट्रोल पंपांवरून तेलाचे नमुने आणले होते. हे नमुने व मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलच्या नमुन्यात मोठा फरक दिसत होता. त्याशिवाय घनताही अधिक आढळून आली. ७४० ते ७४६ पर्यंत आवश्यक असणारी घनता ७६८ पर्यंत गेली होती. हे प्रमाण नियमाबाहेर असून, तेलात भेसळ केल्याशिवाय घनता वाढत नाही. पेट्रोल टाकीतील साठ्याचीही पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी तेलसाठ्याच्या नोंदवहीची मागणी केली. या नोंदवहीत गेल्या दोन दिवसांतील साठाच नोंद नसल्याचे आढळून आले. पथकाने पेट्रोल पंपावरील साठ्याची माहिती घेतली. हा साठा अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने हा पंप सील करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
जिल्हाधिकारी म्हणाले की, या पेट्रोलपंपावर तेलामध्ये भेसळ केली जात असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार छापा टाकून तपासणी करण्यात आली. पेट्रोल टाकीजवळ काळे डाग दिसून येतात. कंपनीकडील शुद्ध तेलाचे डाग पडत नाहीत. त्यामुळे या पंपावरील तेलात भेसळ असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पंपासमोर असलेल्या पट्टणशेट्टी होंडा या शोरुमबाहेर सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे या शोरुममधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे सांगितले.