बापरे! कमळापूर परिसरात बिबट्याचा बछड्यांसह वावर, सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:19 PM2023-02-22T16:19:49+5:302023-02-22T16:27:53+5:30
कमळापूर (ता.खानापूर) येथील आळसंद रस्त्यालगतच्या परिसरातील शेतात मादी जातीच्या बिबट्याचा बछड्यांसह वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड घबराट पसरली आहे.
विटा (जि. सांगली), दिलीप मोहिते : कमळापूर (ता.खानापूर) येथील आळसंद रस्त्यालगतच्या परिसरातील शेतात मादी जातीच्या बिबट्याचा बछड्यांसह वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड घबराट पसरली आहे. बिबट्याच्या वावर असल्याच्या चर्चेवर आता वनविभागाने शिक्कामोर्तब केले असून ट्रॅप कॅमेऱ्यांसह वन विभागाचे कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकºयांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात न जाता सावधनता बाळगावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे यांनी केले आहे.
कमळापूर येथील दशरथ साळुंखे, सुदाम जाधव यांच्यासह अन्य शेतकºयांच्या आळसंद रस्त्याच्या आतील उत्तर बाजूस असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट्या असल्याचे गेल्या चार दिवसापूर्वी शेतकरी व ऊसतोड मजुरांनी पाहिले होते. त्याची माहिती सरपंच जयकर साळुंखे व शंकर साळुंखे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने वनक्षेत्रपाल कांबळे यांना याबाबत कळविले.
त्यानंतर वनक्षेत्रपाल कांबळे यांच्यासह वनपाल महेश आंबी आणि वन कर्मचारी मंगळवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनाही एका लिंबाच्या झाडावर बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ट्रॅप कॅमेºयांव्दारे ठेहळणी सुरू केली. गेल्या चार दिवसापासून बिबट्या तेथील ऊसाच्या शेतात व नंतर लिंबाच्या झाडावर येत असल्याने तो मादी जातीचा असल्याचे व त्याची बछडे ऊसाच्या शेतात असावीत, असा संशय वन अधिकाऱ्यांना आला आहे.
त्यामुळे तेथील परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून मादी जातीच्या बिबट्यासह तिच्या बछड्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मंगळवारपासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात तळ ठोकून आहेत. दरम्यान, त्या परिसरात शेतकरी व ऊस तोड मजुरांनी जाऊ नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल कांबळे यांनी केले असून विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पोलीस पथक ही परिसरात गस्त घालत आहे.
कमळापूर परिसरात मादी जातीच्या बिबट्यासह तिची बछडेही असल्याची माहिती वनक्षेत्रपाल कांबळे यांनी सांगलीच्या वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना दिली असून त्याबाबत कार्यवाही करण्याची तयारी सुरू झाली आहे. या बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकऱ्यांसह नागरीकांतही प्रचंड भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.