आष्ट्यात बिबट्याचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:42+5:302021-07-02T04:18:42+5:30
आष्टा : आष्टा शहर व परिसरात बिबट्याचे मंगळवारी दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी आष्टा पोलीस व वन ...
आष्टा : आष्टा शहर व परिसरात बिबट्याचे मंगळवारी दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी आष्टा पोलीस व वन विभागाने बिबट्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.
मंगळवारी रात्री आष्टा पोलीस ठाणे ते शिंदे चौक या मार्गावर काही युवकांना बिबट्या दिसला होता. पोलीस ठाणे ते सोमलिंग तलाव या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला होता. बुधवारी दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्री सात ते आठच्या दरम्यान महिमान मळ्यातील एका शेतात बिबट्याने श्वानावर हल्ला केला व ऊसात धूम ठोकली. त्यामुळे बुधवारी रात्री तसेच गुरुवारी दिवसभर आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सुतार, उदय देसाई यांच्यासह शिराळाचे वनक्षेत्रपाल एस. आर. काळे, वनरक्षक दीपाली सागावकर, रायना पाटोळे, सुरेश चारापले, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, निवास उघडे, भगवान गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, उस्मान मुल्ला यांनी आष्टा परिसरातील वाड्या-वस्त्यांवर बिबट्याबाबत माहिती घेतली. परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे मिळतात का याची पाहणी केली; मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत ठसे आढळले नाहीत.
चाैकट
ट्रॅप कॅमेरा
आष्टा ते बावची या परिसरात बिबट्या गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वन विभागाने बिबट्याच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरा लावला आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल एस. आर. काळे यांनी दिली.