विट्यात दिग्गजांकडून सुरक्षित प्रभागाचा शोध
By Admin | Published: July 3, 2016 12:18 AM2016-07-03T00:18:55+5:302016-07-03T00:18:55+5:30
नगरपरिषद निवडणूक : मातब्बरांच्या दांड्या गुल : चोवीस जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर
विटा : विटा नगरपरिषदेच्या १२ प्रभागांतील २४ जागांसाठीची आरक्षण सोडत शनिवारी नगरपरिषदेच्या अल्पबचत सभागृहात प्रांताधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना हक्काचा प्रभाग गमवावा लागला असल्याने, त्यांना नवीन व सोयीचा प्रभाग शोधावा लागणार आहे.
विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व विरोधी शिवसेनेचे अमोल बाबर हे दोन ‘दादा’ आणि विद्यमान उपनगराध्यक्ष अॅड. सचिन जाधव व माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील या मातब्बरांच्या हक्काच्या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या दांड्या गुल झाल्याने, त्यांना सोयीच्या व सुरक्षित प्रभागाचे सुरक्षा कवच अंगावर घ्यावे लागणार आहे. या आरक्षण सोडतीत अशोकराव गायकवाड, विनोद गुळवणी, किरण तारळेकर मात्र बचावले आहेत. विटा नगरपरिषदेची नवीन द्विसदस्यीय प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण १२ प्रभागांतील २४ जागांपैकी १२ जागा महिलांना आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी २, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ३ जागांवर सोडत काढण्यात आली. नगरपरिषद शाळा क्र. २ मधील लहान मुलांच्याहस्ते चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत काढऱ्यात आली. २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून द्विसदस्यीय १२ प्रभाग करण्यात आले आहेत.
प्रारंभी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नवीन प्रभाग रचना व हद्दीविषयी माहिती दिली. त्यानंतर महिलांसाठी राखीव असलेल्या जागा आणि आरक्षण सोडतीची प्रक्रिया समजावून सांगितली. या आरक्षण सोडतीवेळी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, नगरसेवक किरण तारळेकर, विशाल पाटील, अॅड. अजित गायकवाड, सुमित गायकवाड, उत्तम चोथे, पद्मसिंह पाटील, अमर शितोळे, सुखदेव पाटील, गंगाधर लकडे, शिवाजी शिंदे, अविनाश चोथे, सचिन शितोळे, मच्छिंद्र कदम, नितीन दिवटे, विलास कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रभागनिहाय : आरक्षण सोडत...
प्रभागनिहाय : आरक्षण सोडत...
प्रभाग क्र. १ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. २ - अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ३ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ४ - अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ५ - अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ६ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ७ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्र. ८ - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ९ - अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. १० - अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण पुरूष. प्रभाग क्र. ११ - अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण पुरूष.
प्रभाग क्र. १२ - अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण पुरूष, असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
फटाके अन् ‘वाजले की बारा...’
विटा नगरपरिषदेच्या प्रभाग आरक्षण सोडतीस सुरूवात झाल्यानंतर श्वास रोखून धरलेल्या अनेक इच्छुकांच्या दांड्या अनपेक्षितपणे धडाधड उडाल्या. दुपारी १२ वाजता आरक्षण सोडत पूर्ण झाली आणि पालिकेच्या इमारतीवरील १२ चा भोंगा वाजला. त्यावेळी उपस्थित असलेले नागरिक सभागृहाबाहेर पडताना आरक्षण सोडतीत दिग्गजांचे ‘वाजले की बारा’ म्हणत दुसऱ्या मजल्यावरून रस्त्यावर आले. त्यावेळी एकाने रस्त्यावर अचानकच फटाके फोडून त्याने गर्दीतून मार्ग काढत घर गाठले. त्यामुळे नागरिकांना फटाके कशाचे, कशासाठी, कोणी अन् किस खुशी में फोडले? असा प्रश्न पडला.
गंडांतराची शक्यता...
विटा नगरपरिषदेची प्रभाग रचना फोडल्यामुळे काही विद्यमान नगरसेवकही अडचणीत आले आहेत. त्यामुळे काहींना प्रभाग बदलावा लागणार आहे. सर्व प्रभागात काही भाग अनपेक्षितपणे आल्याने उमेदवारांची यावेळी चांगलीच कसोटी लागणार आहे. प्रभाग रचनेतील बदल, द्विसदस्यीय प्रभाग आणि आरक्षणाचा बसलेला फटका यामुळे काही विद्यमान नगरसेवकांसह, गेल्या वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप प्रभाग हद्दीबाबत संभ्रमावस्था असल्याने प्रभागांच्या हद्दीचा अभ्यास करून निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेण्याची भूमिका काही इच्छुकांनी घेतली आहे.
४गेल्या निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील व आ. अनिल बाबर यांचे चिरंजीव अमोल बाबर यांच्यात प्रभाग क्र. १ मध्ये चुरशीचा सामना झाला. मात्र यावेळी या दोघांच्याही हक्काच्या समजल्या जाणाऱ्या या प्रभागात दोन्ही जागांवर आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. तसेच उपनगराध्यक्ष अॅड. सचिन जाधव, नगरसेवक नंदकुमार पाटील, सुभाष पाटील या विद्यमानांनाही नवीन प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांच्या प्रभाग क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती पुरूष आरक्षण आल्याने हा प्रभाग त्यांच्यासाठी सोयीचा झाल्याने, त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सत्ताधारी गटातून पद्मसिंह पाटील, जगन्नाथ पाटील, विरोधी गटातून रामचंद्र भिंगारदेवे, शेखर भिंगारदेवे, अॅड. अजित गायकवाड, सुमित गायकवाड, शिवसेनेचे शिवाजी शिंदे, समीर कदम यांच्यासह काही मातब्बरांना यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे.