सुरेंद्र वाळवेकरचा तीन पथकांकडून शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:44+5:302021-06-09T04:32:44+5:30
सांगली : सावकारी व आर्थिक वादातून सांगलीतील बांधकाम व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य ...
सांगली : सावकारी व आर्थिक वादातून सांगलीतील बांधकाम व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सनी गायकवाड, शौकत नदाफ (तिघे रा. भिलवडी, ता. पलूस) यांच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. या पथकाद्वारे संशयितांचा शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी राहुल तावदर हे शंभरफुटी रस्ता परिसरातील गुलाब कॉलनीत राहतात. मूळचे ते भिलवडी (ता. पलूस) येथील असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या वडिलांनी पाच वर्षांपूर्वी मोहन वाळवेकर यांच्याकडून जमीन खरेदीसाठी उसनवारीवर १५ लाख रुपये घेतले होते. ती रक्कम टप्प्याटप्प्याने वाळवेकर यांना परत करण्यात आली होती; परंतु वाळवेकर यांनी आणखी १४ लाख रुपये व्याज झाल्याचे सांगून मागणी केली.
दरम्यान, राहुल यांना तीन दिवसांपूर्वी वाळवेकर यांनी भेटण्यासाठी कॉलेज कॉर्नर येथील कार्यालयात बोलावून घेतले. राहुल त्याठिकाणी गेले, त्यावेळी वाळवेकर यांच्यासह सनी गायकवाड, शौकत नदाफ हे चारचाकी गाडीत बसले होते. राहुल यांना गाडीत बसण्यास सांगण्यात आले व व्याजाच्या पैशांसाठी मागणी करण्यात आली. त्यानंतर सनी गायकवाड याने मारहाण केली. वाळवेकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्ती खंडोबाचीवाडी येथे घेऊन गेले. त्याठिकाणीही धमकी देण्यात आली. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.