रस्ता रुंदीकरणासाठी हवी ‘सिव्हिल’ची जागा
By admin | Published: March 1, 2016 11:23 PM2016-03-01T23:23:33+5:302016-03-02T00:51:03+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : महापौरांचे पत्र, सिव्हिल चौक ते शंभर फुटी रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर पर्याय
सांगली : शहरातील सिव्हिल चौक ते शंभर फुटी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत महापौर हारुण शिकलगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून, शासकीय रुग्णालयाची जागा महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या विकास योजनेत राममंदिर ते सिव्हिल चौक हा रस्ता ६० फुटी आहे. त्यापुढे सिव्हिल चौक ते शंभरफुटी हा दक्षिण-उत्तर रस्ता विकास योजनेत ५० फुटी आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाचे वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय या रस्त्यावर आहे. रुग्णालयात जिल्ह्यासह कर्नाटकातून रुग्ण येतात. त्यात रुग्णालयाच्या कंपाऊंड भिंतीलगत खोकी बसविण्यात आली आहे. रस्त्यांच्या बाजूस रिक्षा स्टॉप, रुग्णवाहिका उभ्या असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
शासकीय रुग्णालयाच्या कंपाऊंड भिंतीपासून वीस फूट आतपर्यंत जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यास हा रस्ता ६० फुटी होऊ शकतो. शासकीय रुग्णालयाकडे २ लाख ६० हजार चौरस मीटर जागा असून, त्यापैकी २४०० चौरस मीटर जागा पालिकेला दिल्यास रुग्णालयाला कोणतीही बाधा होणार नाही, असे मत महापौर शिकलगार यांनी पत्रात व्यक्त केले आहे.
महापौर शिकलगार यांनी शासकीय रुग्णालयाची २० फूट जागा महापालिकेला हस्तांतरित करावी, असे साकडे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना घातले आहे. ही जागा शासनाची असल्याने हस्तांतरणातही अडचण येणार नाही, असेही त्यांचे मत आहे. यावर जिल्हाधिकारी गायकवाड काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
रुंदीकरण होईल : अतिक्रमणाचे काय?
महापालिकेने सिव्हिल चौक ते शंभर फुटी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मानस व्यक्त केला असला, तरी या रस्त्यावरील अतिक्रमणाचे काय? रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लागलेल्या असतात. खोकीधारकांनी रस्ता व्यापला आहे. याशिवाय वाहने रस्त्यावर लावलेली असतात. किमान हे अतिक्रमण हटविले व वाहतुकीला शिस्त लावली तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो.
प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांसाठी साकडे
सांगली : महापालिकेकडील वर्ग एक व दोनच्या रिक्त पदांवर प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी उपमहापौर विजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांचे शिष्टमंडळ मंगळवारी राज्य शासनाच्या नगरविकासच्या प्रधान सचिवांची भेट घेणार आहे. शिवाय महापालिकेच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणीही केली जाणार आहे.
याबाबत घाडगे म्हणाले की, महापालिकेकडील उपअभियंता, शाखा अभियंता बांधकाम, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, वैद्यकीय आरोग्याधिकारी, शहर अभियंता, अतंर्गत लेखापरीक्षक, नगरसचिव, प्रशासन अधिकारी ही पदे रिक्त आहेत. सध्या या पदांचा पदभार महापालिकेकडील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे विकास कामांवर त्याचा परिणाम झाला आहे.
महापालिका हद्दीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सुरू आहेत. या योजना कार्यक्षमपणे राबविण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. अधिकारीच नसल्याने योजनेच्या आर्थिक बाबीवर परिणाम होत आहे. एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक पदभार असल्याने महापालिकेच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. पाणीपुरवठा, आरोग्य या महत्त्वाच्या सेवांचा बोजवारा उडाला आहे. त्यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची मागणी प्रधान सचिवांकडे करणार आहोत. त्याशिवाय महापालिकेसंदर्भात बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी, अशी विनंतीही केली जाणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)