जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:18 AM2017-07-20T00:18:18+5:302017-07-20T00:18:18+5:30
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जत, आटपाडी वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्यादिवशी बुधवारी पावसाची संततधार सुरू होती. शिराळा व इस्लामपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील चांदोली धरणातील पाणीसाठा आता ६३ टक्क्यांवर गेला आहे. सलग दोन दिवसांच्या पावसामुळे शेतीमधील कामांना गती मिळाली आहे.
मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस बुधवारीही कायम होता. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. सांगली, मिरजेला या पावसाने चिंब भिजविले असून, शहराच्या सखल भागात पाणी साचून राहिले आहे. गुंठेवारी भागातील नागरिकांना दोन दिवसांच्या पावसाने पुन्हा दलदलीचा सामना करावा लागत आहे. सांगलीतील शामरावनगर, शंभरफुटी रस्त्यावरील उपनगर, जुना धामणी रस्ता, शिवोदयनगर आदी भागात दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेने उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शहरांमधील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे संपूर्ण शहरभर रस्त्यांवर, चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. पाणी निचऱ्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेने केलेली नाही.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदलेल्या आकडेवारीनुसार शिराळा तालुक्यात ४५ मिलिमीटर, वाळवा तालुक्यात ३०, पलूसमध्ये ८, तासगावमध्ये १२, सांगलीत ९, मिरजेत १६, विट्यात १४, कवठेमहांकाळला ४.३, तर कडेगावमध्ये २१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यानंतरही दिवसभर या तालुक्यांमध्ये पाऊस सुरू होता.
जत आणि आटपाडी या दुष्काळी तालुक्यांमध्ये ढगांची दाटी असली तरी, पावसाचा केवळ शिडकावाच होत आहे. याठिकाणी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच या दोन्ही तालुक्यात मोठा पाऊस झाला होता. एकूण पावसाच्या आकडेवारीत जत अजूनही आघाडीवर आहे. याठिकाणी एकूण २५५ मिलिमीटर, तर आटपाडीत १६६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.