दुसऱ्यादिवशी ४३७ जणांना मिळाली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:49+5:302021-03-04T04:47:49+5:30
सांगली : साठ वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण मंगळवारीदेखील पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही. नोंदणीसाठीचे पोर्टल आजही अडखळतच होते. दिवसभरात ४३७ ...
सांगली : साठ वर्षांवरील ज्येष्ठांचे लसीकरण मंगळवारीदेखील पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही. नोंदणीसाठीचे पोर्टल आजही अडखळतच होते. दिवसभरात ४३७ जणांना लस देण्यात आली. त्यामध्ये महापालिकेचे साखर कारखाना आरोग्य केंद्र आघाडीवर राहिले.
साठ वर्षांवरील ३७९ लाभार्थी व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ५८ जणांनी मंगळवारी लस घेतली. महापालिकेच्या साखर कारखाना आरोग्य केंद्रात ३३ जणांना लस देण्यात आली. आरोग्य कर्मचारी व फ्रण्टलाईन वर्कर्स अशा ९३ जणांना लस दिल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात २५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रण्टलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त नागरिक अशा ६९८ जणांनी दिवसभरात लस घेतली. ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांनी तेथे लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. नोंदणीसाठी https://selfregistration.cowin.gov.in/ ही लिंक उपलब्ध आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात पन्नास टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोफत लसीकरण सुरू होईल, असे आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले.
चौकट
सध्या सुरू असणारी केंद्रे
इस्लामपूर, कवठेमहांकाळ व शिराळा उपजिल्हा रुग्णालये. जत, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, आष्टा, कडेगाव ग्रामीण रुग्णालये. कोकरूड, खंडेराजुरी व नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रे. महानगरपालिका क्षेत्रात सांगली सिव्हिल, मिरज सिव्हिल, हनुमाननगर, जामवाडी, साखर कारखाना, मिरज अर्बन, शामरावनगर, व्दारकानगर, समतानगर, इंदिरानगर, विश्रामबाग व अभयनगर येथील महापालिकेची आरोग्य केंद्रे.