तासगाव तालुक्यात सलग दुसऱ्यादिवशी छापासत्र
By admin | Published: October 20, 2015 10:03 PM2015-10-20T22:03:45+5:302015-10-20T23:50:29+5:30
मटकाविरोधी मोहीम : कवठेएकंद, मांजर्डे, बलगवडेत कारवाई -विट्यात छापा
तासगाव : तासगाव तालुक्यात सुरू असलेल्या मटका व्यवसायाविरोधात तासगाव पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी याविरोधात मोहीम सुरू केली. सलग दुसऱ्या दिवशी कवठेएकंद येथे छापे टाकून दोन मटकाबुकींना ताब्यात घेतले; तर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तासगाव, मांजर्डे, बलगवडे येथे छापे टाकून मटकाबुकींना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. या छापासत्रामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
तासगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या मटका व्यवसाय सुरू आहे. याविरोधात पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी सोमवारी धडक मोहीम सुरू केली. तासगाव उपविभागातील मटका व्यवसाय मोडीत काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तासगाव येथील संतोष नलवडे, संदेश गडगिरे, अनिकेत राक्षे आणि संतोष राक्षे या चार मटकाबुकींना गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून ११ हजार ८०० रुपये हस्तगत केले. मंगळवारी दुपारी मांजर्डे येथे विठ्ठल चव्हाण या मटकाबुकीला ताब्यात घेत ३० हजार रुपये हस्तगत केले, तर बलगवडे येथे बाळकृष्ण कोळी या मटका बुकीलाही ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कवठेएकंद येथे दोन ठिकाणी छापा टाकून मधुकर लवटे आणि अमिर मुजावर या दोघांना ताब्यात घेत ८ हजार रुपये जप्त केले. दोन दिवसांपासून पोलिसांनी सुरू केलेल्या मटकाविरोधी मोहिमेमुळे तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)+
विटा : विटा येथे पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून एका मटका एजंटास ताब्यात घेतले. मंगळवार, दि. २० रोजी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मटका एजंट जालिंदर भिकू गवळी (वय ४५, रा. नेवरी रोड, विटा) याला अटक केली. त्याच्याकडून १०४५ रोख रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. विटा येथील कऱ्हाड रोडवर ही क ारवाई केली. पोलिसांना या ठिकाणी कल्याण मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. गवळीविरुध्द विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, सहा. पोलीस फौजदार व्ही. एल. शेळके तपास करीत आहेत.
राजकीय लुडबूड
कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर काही राजकीय बगलबच्च्यांनी कारवाई टाळण्यासाठी लुडबूड सुरू केल्याचे दिसून येत होते. अवैध धंदेवाल्यांची पाठराखण करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांकडून फिल्डिंग लावली जात होती; मात्र पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला.
तासगाव तालुक्यात मटक्यासह अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. या धंदेवाल्यांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू आहे. तासगाव उपविभागात अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही. अशा धंदेवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी प्रसंगी तडीपारीची कारवाई केली जाईल.
- कृष्णांत पिंगळे, पोलीस उपअधीक्षक, तासगाव.